उत्तर प्रदेशमध्ये अमित शाह यांची कोअर कमिटी सोबत तब्बल १० तास मॅरेथॉन मिटिंग

लखनौ : १२ जानेवारी – निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून भाजपाने पुन्हा एकदा आपलं सरकार आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष जाहीर सभा वा कार्यक्रम घेण्याऐवजी आभासी प्रचार करावा असा आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. १५ जानेवारीपर्यंत जाहीर प्रचारसभा, पदयात्रा, रोड शो, चौक सभा घेण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. यामुळे राजकीय पक्षांवर मर्यादा आल्या असल्या तरी भाजपाने आधीच मोठ्या प्रमाणात सभा आणि विकासकामांचं उद्धाटन करत मतदारांना गाठलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात नुकतीच अमित शाह यांनी कोअर कमिटीची तब्बल १० तास बैठक घेतली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीमधील पक्षाच्या कार्यालयात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी संबंधित पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा उपस्थित होते. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ही बैठक तब्बल १० तास सुरु होती.
रिपोर्टनुसार, अमित शाह यांनी महत्वाच्या नेत्यांसोबत वेगळी बैठकदेखील घेतली. उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारीपासून निवडणुकीला सुरुवात होणार असून यानिमित्ताने काही महत्वाची नावं तसंच धोरणावर चर्चा झाली.
ही बैठक बुधवारी पुन्हा होणार असल्याची माहिती आहे. यावेळी जागांसहित पुन्हा एकदा निवडणुकीच्या धोरणासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. सोमवारी भाजपाच्या २४ सदस्यीय उत्तर प्रदेश निवडणूक समितीची लखनऊत बैठक पार पडली. यावेळी पहिल्या दोन टप्प्यात पार पडणाऱ्या ११३ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. उत्तर प्रदेशात एकूण ४०३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. १० फेब्रुवारीपासून सात टप्प्यात ही निवडणूक पार पडेल. राजकीय आणि देशपातळीवरही उत्तर प्रदेश निवडणूक फार महत्वाची आहे.
उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३, २७ आणि ३ व १७ मार्चला मतदान होणार आहे. १० मार्चला मतमोजणी होईल. २०१७ मध्ये भाजपाने ४०३ पैकी ३१२ जागा जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. समाजवादी पक्षाला ४७ तर बसपाला १९ आणि काँग्रेसला फक्त सात जागांवर विजय मिळाला होता.

Leave a Reply