वर्धेत अल्पवयीन मुलीचा अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह तिघांना अटक

वर्धा : ११ जानेवारी – वर्धा जिल्ह्यातील आर्वी याठिकाणी एका १३ वर्षीय शाळकरी मुलीचा अवैध पद्धतीने गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी पाळत ठेवून महिला डॉक्टरसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यासोबतच पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केलं असताना, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास आर्वी पोलीस करत आहेत.
डॉ. रेखा कदम, किशोर सहारे आणि नलू सहारे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई वडील मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पीडित मुलगी शाळेत गेली नाही. दरम्यानच्या काळात शेजारी राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलानं तिचं लैंगिक शोषण केलं. यातूनच पीडित मुलगी गर्भवती राहिली. यानंतर अलीकडेच पीडित मुलीचं पोट दुखू लागल्यानं नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं.
यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती आढळली. याबाबत पीडित मुलीकडे विचारपूस केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, पीडित मुलीच्या आईने आरोपी मुलाच्या आई वडिलांना हा प्रकार सांगितला आणि पोलिसात तक्रार करण्यासाठी जाऊ लागली. यावेळी मुलाच्या आई वडिलांनी पीडित मुलीची बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच पीडित मुलीचा गर्भपात करण्यासाठी डॉक्टर कदम यांच्या रुग्णालयात नेलं. याठिकाणी गर्भपात करण्यासाठी लागणारे तीस हजार रुपये मुलाच्या आई वडिलांनी भरले.
त्यानंतर पीडितेला ४ जानेवारी रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ६ जानेवारी रोजी भल्या पहाटे चार वाजता पीडित मुलीचा गर्भपात झाला. या प्रकारानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना धमक्या देणं सुरूच ठेवलं. यानंतर पीडित मुलीच्या आईनं आर्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. रविवारी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी महिला डॉ. रेखा कदम यांच्यासह किशोर सहारे आणि नलू सहारे यांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply