भीषण कार अपघातात ४ जणांचा मृत्यू

अकोला : १० जानेवारी – अकोला जिल्ह्यातील अकोट शेगाव रोडवर एका भरधाव मारुती सुझुकी कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, याच ठिकाणी मागील महिन्यात ३ अपघात झाले असून ७ जणांचा हाकनाक बळी गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील अकोट शेगाव रोडवर असलेल्या रौदळा फाट्याजवळ हा अपघात घडला. आज रात्री परतवाडा येथील कुटुंब आपल्या मारुती सुझुकी एर्टिगा गाडी क्रमांक एम एच २७ एआर ९७९६ या गाडीने परतवाडाकडे जात होते. भरधाव वेगात असलेली गाडी जेव्हा रौंदळा फाट्यानजीक पोहोचली तेव्हा अर्धवट राहिलेल्या रोडवर आदळली. गाडी भरधाव वेगात असल्यामुळे आदळल्यानंतर कार पलटी झाली नाआणि झुडपात जाऊन दोन तीन वेळा पलटी होऊन थांबली.
या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. कारचे छत आणि समोरील भागाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील ४ जणांचा मृत्यू झाला. गावातील स्थानिक मदतीला धावून आले. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply