कर्जाचा अर्ज फेटाळल्यामुळे ग्राहकाने चक्क बँकेलाच लावली आग

बेंगळुरू : ११ जानेवारी – कर्जाचा अर्ज फेटाळल्यामुळे एका व्यक्तीने कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यात बँकेलाच आग लावली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरोधात कलम ४३६, ४७७, ४३५ नुसार कागिनेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपीचे नाव वसिम मुल्ला असे आहे. तो रट्टीहल्ली इथला राहणारा असून ३३ वर्षांचा आहे. आरोपी मुल्ला याला कर्ज हवे असल्याने त्याने कॅनरा बँकेच्या शाखेशी संपर्क साधला. मात्र, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर बँकेने त्याला कर्ज देण्यास नाकार दिला, असे पोलिसांनी सांगितले. त्याला सीबील स्कोअर कमी असल्याने त्याचे कर्ज बँकेने नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.
कर्जचा अर्ज नाकारल्यानंतर आरोपी वसिम मुल्ला हा शनिवारी रात्री बँकेजवळ पोहोचला. त्याने बँकेची खिडकी फोडली आणि बँकेच्या कार्यालयात सर्वत्र पेट्रोल ओतले. त्यानंतर त्याने बँकेत आग लावली. बँकेजवळून जाणाऱ्यांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
आगीत बँकेचे १२ लाखांचे नुकसान झाले आहे. ५ कम्प्युटर, फॅन, लाइट्स, पासबुक प्रिंटर, कॅश काउंटिंग मशिन, कागदपत्रे, सीसीटीव्ही आणि कॅश काउंटर जळून खाक झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपी वसिम मुल्ला याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply