छतावरून गेलेल्या विजेच्या हायव्होल्टेज तारेला स्पर्श होऊन मुलाचा मृत्यू

नागपूर : ६ जानेवारी – मामाच्या मुलांसोबत घराच्या छतावर खेळत असलेल्या विद्यार्थ्याचा छतावरून गेलेल्या विजेच्या हायव्होल्टेज तारेला स्पर्श झाला. यात विजेचा जोरदार धक्का लागल्याने काही क्षणात मृत्यू झाला. ही घटना वाडी शहरात दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रतीक संतोष मेश्राम (१६, रा. मंगलधाम सोसायटी, वाडी) असे मृत मुलाचे नाव आहे. विमलताई तिडके विद्यालयात तो शिकायचा. तो यावर्षी दहावीच्या वर्गात होता. कोरोना संक्रमणामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आणि तो त्याच्या आई-वडिलांसोबत अमरावती शहरात राहायला गेला होता. अलीकडे, शाळा सुरू झाल्याने तसेच दहावीचे वर्ष असल्याने तो काही दिवसांपूर्वी मामा कैलास गुरादे यांच्याकडे राहायला आला होता. प्रतीक शाळा सुटल्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास घरी आला होता. जेवण आटोपल्यानंतर तो मामाचा छोटा मुलगा व मुलीसोबत घराच्या छतावर लपंडाव खेळायला लागला. विशेष म्हणजे, त्याच्या मामाच्या घरावरून ११ केव्ही क्षमतेच्या हायव्होल्टेज विजेच्या तारा गेल्या आहेत. खेळताना प्रतीकच्या हाताचा स्पर्श तारेला झाला व यात तो गतप्राण झाला.
वाडी, हिंगणा यांसह अन्य काही शहरांमधील काही घरांवरून विजेच्या हायव्होल्टेज तारा गेल्या आहेत. या धोकादायक तारा स्थानांतरित करण्याची किंवा त्याला कोटिंग करण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वीही अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत.

Leave a Reply