गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रचंड नुकसानीची भीती

भंडारा : ६ जानेवारी – गोसेखुर्द धरणात पूर्ण क्षमतेने पाण्याचे संचय करण्याची प्रक्रि या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने पाण्याचे संचय होत असल्याने बॅक वॉटरचा फटका भंडारा शहरासह नदीकाठावरील अनेक गावांना बसत आहे. १0 जानेवारीपर्यंत पूर्ण संचय पातळी गाठण्यात येणार असल्याने नदीच्या बॅकवॉटरमुळे प्रचंड नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.
गोसे प्रकल्पाची अंतिम पाण्याची पातळी २४५.५0 मीटर इतकी आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने १ नोव्हेंबरपासून पाण्याचे संचय करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार वैनगंगेच्या पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. पाणीसाठय़ात वाढ होताच नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरले आहे. पाणी पुरवठा योजना, स्मशानभूमी, रस्ते गावातील आठवडी बाजारातील जागा, लहान पूल पाण्याखाली आले आहेत. पाणी संचनासाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीव्यतिरिक्त ज्या क्षेत्राचा विचारही केला नव्हता तिथेही पाणी साचत असल्याने नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
नदीच्या बॅकवॉटरचा सर्वाधिक फटका शेतपिकांना बसला आहे. नदीकाठावरील गावात नेहमीप्रमाणे यावेळी खरीपाची लागवड करण्यात आली होती. परंतु, नोव्हेंबर महिन्यापासून या शेतशिवारात अचानकपणे पाण्याचे संचय होत गेल्याने पिक खरवडून गेली आहेत. त्यामुळे शेतकर्यांना त्या पिकाचे उत्पन्न घेता आले नाही. आजघडीला या शेतातील पिके पाण्याखाली आली असून धुर्यावर लावलेली तूर काळवंडलेली आहे. अद्याप गोसे धरणाची अंतिम पातळी गाठली नसताना ही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. १0 जानेवारीपर्यंत पाण्याची अंतिम पातळी गाठली जाणार असून, तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल, हे पाहणे औत्सुकतेचे राहणार आहे.

Leave a Reply