राज्यात मुख्यमंत्री बदलला जाणार, या चर्चांना कोणताही अर्थ नाही – संजय राऊत

मुंबई : ५ जानेवारी – उद्धव ठाकरे यांची प्रकृती व्यवस्थित आहे. ते कामाच्या फायलींवर सह्या करत आहेत, अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुढाकार घेऊन काम करत असले तरी ते उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच काम करत आहेत. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री बदलला जाणार, या चर्चांना कोणताही अर्थ नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ते बुधवारी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांना राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या सुरु असलेल्या चर्चांविषयी विचारणा करण्यात आली. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे रश्मी ठाकरे यांच्याकडे दिली जाणार, असे संकेत शिवसेनेच्या मंत्र्याकडूनच दिले जातात. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेत तथ्य आहे का, असे राऊत यांना विचारण्यात आले. तेव्हा राऊत यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. आगामी काळात उद्धव ठाकरे हेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. ते त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील, असा विश्वास मला आहे. त्यामुळे जे लोक मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरे यांच्या नावाची चर्चा करत आहेत, त्यांना करु द्यात. अब्दुल सत्तार हे सध्या आमच्या पक्षात आहेत, ते आमचे सहकारी आहेत. पण त्यांनी शिवसेनेत २५ वर्षे पूर्ण केली की त्यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेतले जाईल. अजून त्यांच्या अंगाला लागलेली शिवसेनेची हळद उतरायचेय, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली
तसेच सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अजित पवार हेच राज्याच्या कारभाराची सूत्रे हाताळत असल्याविषयीही राऊत यांना विचारण्यात आले. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, राज्य चालवणं हे टीम वर्क आहे. अजित पवार हे राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्वात अनुभवी मंत्री आहेत. पुढाकार घेऊन काम करणे हा त्यांचा बाणा, त्यांच्या कार्यपद्धती आहे. पण उपमुख्यमंत्रीही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार काम करत आहेत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सध्या काही वैद्यकीय बंधने आहेत. मात्र, ही बंधने सदैव राहणार नाहीत, ती कधीतरी दूर होतील. तरीही उद्धव ठाकरे त्यांचे काम करतच आहेत. याउलट दिल्लीत धडधाकट असलेल्या माणसांनाही काम करुन दिले जात नाही. भाजपने शब्दांचे कितीही बार उडवले तरी सरकारच्या केसाला धक्का लागणार नाही. भाजपचे नेते याला लकवा मारला, त्याला लकवा मारला, अशी टीका करतात. पण लकवा म्हणजे काय हे पाहायचे असेल तर केंद्र सरकारच्या कारभाराकडे पाहावे, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

Leave a Reply