ओंजळीतील फुलं : ८ – महेश उपदेव

28 dec mahesh updeo final

एकीकडे आमचा बास्केटबॉल बहरत असताना शिक्षणाबरोबर नोकरीही सुरु होती. पत्रकारितेतील आव्हाने वाढत चालली होती. क्रीडा पत्रकारितेत विविध खेळातील उपेक्षित खेळाडूंना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे काम करीत होतो. झिरो बजेटमध्ये नोकरी गेल्यानंतर नोकरीसाठी किती झगडावे लागते याचा अनुभव पाठीशी होता. नागपूरच्या उदयोन्मुख खेळाडूंना शासकीय सेवेत नोकरी कशी मिळवून देता येईल, याकरिता प्रयत्न करीत होतो. सामना मध्ये माझे लिखाण काम सुरूच होते.

पत्रकारिता हाच धर्म

आता मनापासून ठरवून टाकले होते कि पत्रकारितेतच आपण करियर करायचे. जनसंवाद विभागातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशनची पदवी घेतल्यानंतर नागपूरच्या स्थानिक वृत्तपत्रात काम मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय प्रकाश देशपांडे व स्वर्गीय सिद्धार्थ सोनटक्के नागलपूरचा पहिला मराठी सायं दैनिक काढणार असल्याची माहिती मला मिळाली. मी प्रकाश देशपांडे व सिद्धार्थ सोनटक्के सरांची भेट घेतली. आम्ही १ मे १९९३ पासून पेपर सुरु करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तू आमच्याबरोबर काम केले तर आनंद वाटेल असे प्रकाश देशपांडे यांनी सांगितले. “खबर” हे मराठीतले पहिले मराठी सायं दैनिक नागपुरात सुरु झाले. या वृत्तपत्राचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. प्रकाश देशपांडे सिद्धार्थ सोनटक्के यांच्यासोबत काम करत असताना अनुभवी पत्रकारांबरोबर काम करायचा वेगळा आनंद मिळाला. माझ्याकडे त्यांनी क्रीडा विभागाची जबाबदारी सोपवली. अल्पावधीत माझे क्रीडा पान चांगलेच गाजले. रोज मी काय देतो याकडे सर्व क्रीडाप्रेमींच्या नजर लागल्या असायच्या. क्रीडा संघटनांमध्ये सुरु असलेले घोटाळे मी उघडकीस आणले. अन्यायग्रस्त खेळाडूंना न्याय मिळवून दिला. हे काम बघून प्रकाश देशमुख यांनी देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे वार्तांकन करण्याची संधी दिली.

नो प्रशांत नो मॅच

नागपूरचा क्रिकेटपटू प्रशांत वैद्य याला भारतीय संघात प्रवेश मिळावा यासाठी तो दार ठोठावत होता. अहोरात्र मेहनत घेऊनही त्याला प्रवेश मिळत नव्हता. आपल्या लेखणीतून प्रशांत वैद्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी लिखाण सुरु केले. १९९४ ला नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर हिंदुस्थान विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना आयोजित करण्यात आला होता. नो प्रशांत वैद्य नो मॅच या मथळ्याखाली बातमी प्रकशित केली. या बातमीला इतका प्रतिसाद मिळाला क्रीडाप्रेमींनी हा प्रश्न उचलून धरला. नागपूरचे क्रीडा प्रेमी प्रशांत वैद्यच्या पाठीशी उभे राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता व्हीसीए च्या मैदानावर वेस्ट इंडिज सोबतच सामना सुरु झाला. उपहाराच्या काही मिनिटं अगोदर स्टेडियम मधून अचानक मैदानावर संत्र्याचा मारा सुरु झाला. एव्हडी संत्री अचानक आल्यामुळे आयोजक ही अचानक भांबावून गेले. पंचांनी सामना थांबविला एकच गलका सुरु झाला. पोलीस कर्मचारी स्टेडिअममध्ये दाखल झाले. संत्री कुठून येत आहेत हे त्यांना कळतच नव्हते.

अजित वाडेकर यांची मध्यस्थी

हिंदुस्थान संघाचे व्यवस्थापक अजित वाडेकर होते. त्यांनी माझी बातमी वाचली होती. त्यामुळेच हा प्रकार घडत आहे हे त्यांच्या लक्षात आले मी स्टेडियम मधील प्रेस गॅलरीत बसून वार्तांकन करत असताना व्हीसीए चे सचिव स्वर्गीय गोपाळराव केळकर तेथे आले, महेश तुला अजित वाडेकर यांनी आताच बोलावले आहे तू चल असे त्यांनी सांगितले. केळकर यांच्याबरोबर मी खेळाडूंच्या गॅलरीत गेलो. अजित वडेकरांनी मला विचारले महेश काय चालू आहे. मी त्यांना एकच प्रश्न केला कि प्रशांत वैद्यचा ११ मध्ये समावेश का नाही? यादरम्यान त्यावेळचे शिवसेनेचे नागपूरचे जिल्हाप्रमुख उमेश झाडगावकर यांनाही वाडेकरांनी बोलवले. संत्रा फेकण्याचा प्रकार थांबवा अशी त्यांनी विनंती केली. प्रशांत वैद्यला दुसऱ्या सामन्यात खेळवतो असे लेखी आश्वासन अजित वाडेकर यांनी झाडगावकर यांना दिले. त्यानंतर सामना सुरळीत सुरु झाला. वाडेकरांनीही शब्द पाळला, प्रशांत वैद्यचा दुसऱ्या सामन्यात संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश झाला. हा माझ्या लेखणीचा विजय होता. माझा पेपर छोटा असला तरीही लेखणीची कमाल दिसून आली. ही आठवण मी कधीच विसरू शकत नाही.
मला पत्रकारितेत खरे मार्गदर्शन सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत साहेब तसेच खबर चे संपादक प्रकाश देशपांडे, सिद्धार्थ सोनटक्के, महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोडबोले, लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांचे मिळाले.
राजकीय बातम्या कश्या असायला हव्या आपली बातमी पण १ वर कशी लागेल, त्यासाठी कसे लिखाण करावे, याचे मार्गदर्शन गोडबोले आणि बर्दापूरकर सरांनी केले.
प्रकाश देशपांडे सरांचा माझ्यावर खूप विश्वास होता. या पोऱ्याला कोणत्याही बीटमध्ये पाठवले तरीही तो चांगली बातमी आणेल असा त्यांना विश्वास होता. त्यावेळी माझे सहकारी संजय तिवारी, राहुल अवसरे, धनराज गावंडे, रवी गुळकरी, मनीष बोधी हे होते. क्रीडाच्या बातम्या झाल्या कि क्राईम च्या बातम्या मी करायला लागलो. राहुल अवसरे त्यावेळी क्राईम रिपोर्टींग मध्ये स्टार पत्रकार होते. आमची बातमी म्हणजे रात्रीच्या वृत्तपत्रांच्या वार्ताहरांसाठी चांदी असायची. कोणत्याही घटनेची बातमी दुपारी १२ वाजताच पेपरच्या माध्यमातून लोकांच्या हातात पडायची.
विद्यापीठही गाजविले.
त्यावेळी मी विद्यापीठाच्या बातम्या देत होतो. बनावट गुणपत्रिका घोटाळ्यातील प्रमुख आरोपी यादव कोहचाडें याची पोलखोल करणारी वृत्तमालिका प्रकाशित केली होती. कार चालकाचा कुलसचिव कसा झाला. हे प्रकरण चांगलेच गाजले. माजी कुलगुरू स्वर्गीय दादासाहेब काळमेघ हे त्यावेळी नामांकित कुलगुरू होते. तर कोहचाडे त्यांचा कार चालक होता. काळमेघ यांनी एका प्रकरणाची पत्रपरिषद जुन्या पत्रकार भवनात घेतली. पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर दादासाहेब चांगलेच भडकले. त्यांनी भर पत्रपरिषदेत आपल्याजवळच्या काठीतून गुप्ती बाहेर काढली. माझे कुणीही काहीही करू शकत नाही अशी धमकीही त्यांनी देऊन टाकली. मी दादासाहेबांच्या गुप्ती घेतलेल्या फोटोसहित बातमी प्रकाशित केली. त्यानंतर विद्यापीठात एकच खळबळ माजली. अशा अनेक माझ्या बातम्या चांगल्याच गाजल्या. प्रकाश देशपांडे, सिद्धार्थ सोनटक्के, धनंजय गोडबोले, प्रवीण बर्दापूरकर सरांनी मला चांगले प्रोत्साहन दिले. त्यातून माझी कारकीर्द फुलायला लागली. त्यानंतर मी मागे वळून बघितलेच नाही.

डावललेला विदर्भ, डिवचलेला विदर्भ

१९९३ मध्ये पुणे येथील बाणेर, आत्ताची बालेवाडी येथे सुरेश कलमाडी यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही आयोजित कराव्या जेणेकरून इतर जिल्ह्यात खेळाच्या पायाभूत सुविधा निर्माण होतील व खेळाचा विकास होईल हा आमचा खरा उद्देश होता. एकाच ठिकाणी स्पर्धा घेऊ नये म्हणून मी आणि महाराष्ट्र टाइम्सचे क्रीडा संपादक वि. वि. करमरकर यांनी विशेष विरोध केला होता. नागपूर मध्ये हँडबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉलचे अनेक नामवंत संघ व खेळाडू होते. यानिमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यात स्टेडियम निर्माण झाले असते. पण हेकेखोर कलमाडी काही ऐकायला तयार नव्हते. हॅण्डबॉलच्या महाराष्ट्राच्या संघामध्ये १० खेळाडू नागपूरचेच असायचे सीताराम भोतमांगे यांच्या मार्गदर्शनात नागपूरचे राजकुमार नायडू, पपलू नायडू, आत्माराम पांडे, वीरेंद्र भांडारकर, मिलिंद माकडे, राजन वेळूकर, धनंजय वेळूकर हे नावाजलेले खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला विदर्भातील खेळाडूंनीही विरोध केला होता. यादरम्यान लातूरला भूकंपाचा धक्का बसला. भूकंपामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वेळी वि. वि. करमरकर या स्पर्धेचे वार्तांकन करण्यासाठी पुणे येथील बालेवाडीत गेलो त्यावेळी माझ्यासोबत नागपूरचे तरुण भारतचे पत्रकार अनिल मोहरील, लोकमतचे जॉय चक्रवर्ती होते. स्पर्धेदरम्यान कलमाडीची रोज पोलखोल करीत असल्यामुळे मला व करमरकर सरांना कालमाडीच्या माणसांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. कालमाडीच्याच धमकींना भीक न घालता आम्ही लिखाणाचे काम करून कालमाडींची पोलखोल केली.

कांस्यपदक माझ्या गळ्यात

१५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत बहादूर प्रसाद याने कांस्यपदक मिळवले होते. पण स्पर्धेदरम्यान तो चक्कर येऊन पडला त्यामुळे विक्टोरी स्टॅण्डवर तो पोहोचू शकला नाही त्यावेळी मी ट्रॅकसूट घालून वार्तांकन करत होतो. ज्येष्ठ पत्रकार, ऍथलेटिक संघटनेचे पदाधिकारी प्रल्हाद सावंत यांनी बहादूर प्रसादच्या ऐवजी व्हिक्टरी स्टॅण्डवर मलाच उभे केले. पाहुण्यांच्या हस्ते माझ्या गळ्यात कांस्यपदक घालण्यात आला. जलाल आगा या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय दूरदर्शनवर हा कार्यक्रम दाखविण्यात आला. अनिल मोहरील व जॉय चक्रवर्ती यांनी हा प्रकार पहिला आणि एक चांगली बातमी केली. १५०० मीटर न धावताच पत्रकाराच्या गळ्यात कांस्यपदक या मथळ्याखाली ही बातमी देशभरातील वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी क्रीडा पानावर फोटोसहित लावली.
राष्ट्रे क्रीडा स्पर्धेचे माझे वार्तांकन चांगलेच गाजले. कलमाडी यांची पोलखोल केल्यामुळे पुणे येथील एका क्रीडा संघटनेने मला उत्कृष्ठ क्रीडा पत्रकारितेचा पुरस्कार देऊन गौरविले. तो माझा माझ्या आयुष्यातील पहिला क्रीडा पुरस्कार होता.

जय महाराष्ट्र

महेश उपदेव

Leave a Reply