मिसेस मुख्यमंत्री : भाग -१

( राजकीय दीर्घकथा – लेखक अविनाश पाठक )

सकाळचे ११ वाजले होते. आमदार प्रशांत देशमुख आपल्या निवासस्थानातील कार्यालयात बसले होते. सोबत तीन विश्वासू कार्यकर्तेही होते. अचानक टेलिफोनची घंटा वाजली. पलीकडून ऑपरेटर बोलत होता. “साहेब आपल्याकडे अँडीशनल कलेक्टर आल्या आहेत. आत पाठवू का?” म्हणून विचारणा केली. “असं कर त्यांना ड्रॉईगरुममध्मे बसव, मी पाचच मिनिटात आलो”, असे सांगून त्यांनी फोन बंद केला. लगेचच त्यांनी चर्चा आटोपती घेतली आणि ड्रॉईगरुममध्य् निघाले. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन अगदी तोंडावर आले होते. आज सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांचे फोनवर बोलणे झाले होते. विधीमंडळात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्मान जिल्ह्याच्या आणि विशेषत… मतदारसंघाच्या कोणकोणत्या मागण्या आणि त्यासाठी किती निधीचा आग्रह धरायचा यावर प्राथमिक चर्चा झाली होती. त्यावेळेस त्यांनी आज ११ वाजता अँडीशनल कलेक्टरंना आपल्याकडे सर्व तपशील आणि कागदपत्रेच घेऊन पाठवतो असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसारच अँडीशनल कलेक्टर आल्या असाव्या असा विचार करीत ते ड्राँईगरुमकडे निघाले. नुकत्याच झालेल्या काही बदल्यांमध्मे नागपूर जिल्ह्याच्या काही अधिकाऱ्यांनाही हलवले होते. त्यातच आधीचे अँडीशनल कलेक्टर शाम देशपांडे बदलून भंडाऱ्याला गेले होते. त्यांच्या जागी कोणीतरी बाई आल्या आहेत असे कळले होते. मात्र प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. कोणीतरी एखादी तहसिलदारपदापासून हळूहळू वर चढत गेलेली प्रमोटी सिनिअर बाई रिटायरमेंटच्या तोंडावर नागपुरात पाठविली असणार असा विचार करीत ते ड्राँईगरुममध्ये पोहोचले. ‘नमस्कार आमदार साहेब, या आवाजाने ते भानावर आले. बघतात, तर समोर एक तिशीतली तरुणी उभी राहून त्यांना अभिवादन करीत होती. या तरुणीकडे बघून देशमुख एकदम दचकलेच. त्यांच्या मनातल्या प्रतिमेशी विपरित अशी अँडीशनल कलेक्टर त्यांच्यासमोर उभी होती. “साहेब मी आश्विनी खासनीस, नुकतीच नागपूरला अँडीशनल कलेक्टर म्हणून बदलून आलेली आहे. आपल्याकडे मला कलेक्टरसाहेबांनी पाठवले आहे” त्या तरुणीने आपली पूर्ण ओळख दिली. आश्विनी खासनीस ही जेमतेम तिशीतली तरुणी होती. उंच सडपातळ बांधा, गोरा वर्ण, देखणे रुप, फिक्क्या रंगाची पण आकर्षक डिझाईनची नेसलेली साडी आणि साधीच केशरचना अशा अवतारातली ही अँडीशनल कलेक्टर म्हणजे देशमुखांच्या मनातल्या प्रतिमेला धक्का होता. मात्र क्षणभरात त्यांनी स्वतःला सावरले. इतकी तरुण अँडीशनल कलेक्टर आहे म्हणजे ही निश्चितच अभ्यासू आणि हुशार असणार. म्हणजे तिच्याबरोबर काम करायला आणि तिच्याकडून काम करवून घेताना निश्चितच समाधान मिळेल असा विचार करीत त्यांनी आश्विनी खासनीसांना प्रतिसाद दिला.
“नमस्कार मॅडम, आपण बसा ना, आपण येणार म्हणून सकाळीच मला कलेक्टर ठाकरे साहेबांचा फोन होता त्यामुळे मी आपली वाटच बघत होतो” असे सांगून सोफ्याच्या एका खुर्चीवर प्रशांत देशमुख बसले. समोर आश्विनी खासनीस बसल्या आणि चर्चेला सुरुवात झाली. चर्चा सुरु असतानाच प्रशांत देशमुखांनी घरात निरोप पाठवून दोघांसाठीही चहा सांगितला. सोबत आईलाही बोलाव असाही निरोप दिला. थोड्याच वेळात नोकर चहा घेऊन आला आणि पाठोपाठ प्रशांत देशमुखांच्या आई शालिनीताईही आल्या. “आई या आश्विनी खासनीस, नागपूरच्या नव्या अँडीशनल कलेक्टर, आणि मॅडम ही माझी आई,” अशी देशमुखांनी ओळख करून देताच आश्विनी खासनीस उठल्या आणि शालिनीताईजवळ जात त्यांच्या पायाला स्पर्श करीत नमस्कार केला. “अहो राहू द्या नं, वाकून नमस्कार करायची काही गरज नाही”. असे शालिनीताईंनी सांगताच “नाही कसे? आपण ज्येष्ठ आहात, माझ्या आईच्या वयाच्या, त्यामुळे आपल्याला वाकूनच नमस्कार करायलाच हवा” असे म्हणत खासनीस मॅडम बाजूला झाल्या. थोड्यावेळ परस्परांची चौकशी झाल्यावर शालिनीताई आत गेल्या आणि चर्चा पुढे सुरू झाली. नागपूर जिल्ह्याचे प्रश्न बरेच होते आणि खासनीस मॅडम पूर्ण अभ्मास करून आल्या होत्या. त्यामुळे चर्चा बरीच लांबली. घड्याळ्याचा काटा जसा दुपारच्या दीडकडे सरकू लागला तशा शालिनीताई उठून ड्रॉईंगरुममध्ये आल्या. “प्रशांत जेवणाची वेळ झाली आहे ना, तुही जेवायला ये आणि यांनाही तुझ्याच सोबत जेवायला येऊ दे ” असे शालिनीताईंनी म्हणताच आश्विनी खासनीसांनी लटका विरोध दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशांत आणि शालिनीताईंच्या आग्रहापुढे त्यांना हार मानावी लागली. शेवटी प्रशांतसोबत त्याही डायनिंग टेबलकडे पोहोचल्या. जेवतानाही दोघांची विधानसभेत मांडायच्या विषयांवरच चर्चा सुरु होती. शेवटी शालिनीताईंनाच आठवण करून द्यावी लागली “अरे बाबांनो, पहिले जेवा तुमची चर्चा मग चालूच राहील”. प्रशांत देशमुखांची आमदारकीची ही दुसरी टर्म होती. पहिल्यांदा राज्यातल्या सत्ताधारी असलेल्या भारतीय राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारीवर ती विजयी झाले होते त्यामुळे गेली पाच वर्षे सत्ताधारी आमदार म्हणूनच त्यांचे काम होते. यावेळी मात्र राज्यात सत्ता बदल झाला होता. प्रशांत देशमुख विरोधीपक्षात होते. त्यामुळे समस्या जास्त आक्रमकपणे मांडण्यातच त्यांना रस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत चर्चाच चालली. निघतांना प्रशांतसोबत शालिनीताईंचाही निरोप घेऊन आश्विनी खासनीस कार्यालयात निघाल्या.


प्रशांत देशमुख हे भारतीय राष्ट्रीय पक्षाचे तरुण तडफदार आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी शिकत असतानाच विद्यार्थी राजकारणातून आपले स्थान बनवायला सुरुवात केली होती. त्या काळात ते फक्त विद्यार्थी नेतेच नव्हते तर एक गुणवंत विद्यार्थी म्हणूनही ते ओळखल्या गेले होते. बीएससीला त्यांनी ५ सुवर्णपदकांसह ११ पुरस्कार मिळविले होते. नंतरही प्रत्येक परीक्षेत ते टॉपवरच राहिले होते. याशिवाय वक्तृत्व, नाट्य, साहित्य अशा सर्वच क्षेत्रात त्यांचा दांडगा अभ्मास होता. त्यामुळे वयाच्या २७ व्या वर्षीच ते आमदार बनले. आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने त्यांनी पहिल्या ५ वर्षातच सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून दोनदा पुरस्कार घेतला होता. यावेळी जर त्यांच्या पक्षाला सत्ता मिळाली असती तर त्यांचे मंत्रिपद नक्की होते. विद्वत्तेसोबत त्यांना देखणे असे व्यक्तिमत्वही लाभले होते. त्यांच्या अभ्यासूवृत्तीने प्रशासनावर त्यांचा धाक जरुर होता मात्र त्यांच्या मनमिळावू वृत्तीने प्रशासनीक अधिकाऱ्यांची त्यांची चांगली मैत्रीही जमली होती.
प्रशांतचे वडील मधुकरराव देशमुख हे नागपूरातले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. गेली अनेक वर्ष ते हायकोर्टात वकिली करत होते. त्यांना प्रशांत आणि प्रदीप अशी दोन मुले तर प्रज्ञा ही एक मुलगी, तिघेही तसे गुणवंत विद्यार्थी म्हणूनच ओळखले गेले. मोठा प्रदीप मधुकररावांसोबतच वकिली करत होता. प्रज्ञा लग्न होऊन सासरी सुखात नांदत होती. मधला प्रशांत मात्र राजकारणात आला होता. वकिली सोबत नागपूर जिल्ह्यातच मधुकररावांची शेतीवाडीही भरपूर होती. याशिवाय प्रशांतच्या नावावर हिंगणा एमआयडीसीत एक कारखानाही उभारला होता. त्यात प्रशांतसोबत त्याचा चुलतभाऊ रमेश देशमुख हा भागीदार होता. कारखान्याचा कारभार रमेशचचं सांभाळायचा. कारखान्यात नफाही चांगला होता. त्यामुळे सधन परिवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिवारातला एक असल्यामुळे प्रशांतला राजकारण करायला पूर्णतः मोकळीक होती. त्यामुळेच अल्पावधीतच प्रशांतने आपले स्थान पक्के केले होते. देशमुखांकडली बैठक आटोपून निघालेल्या आश्विनी खासनीस या देखील प्रशांत देशमुखांच्या एकूणच व्यक्तिमत्वाने भारावल्या होत्या. त्यांची अभ्यासू वृत्ती ही खरोखरी वाखाणण्याजोगी होती. अशा अभ्यासू राजकारणी नेत्याला प्रशासनातले अधिकारी थापा मारू शकणार नाहीत असा विचार आश्विनीच्या मनात आला. आश्विनी खासनीस या विदर्भातल्याच, काही शिक्षण अमरावतीत तर नंतर नागपुरात झाल्यावर त्या आयएएस झाल्या. विशेष म्हणजे बी.एससी पास झाल्यावर पहिल्याच झटक्यात त्यांनी आयएएसची परीक्षा पास केली. सोबतच एलएलबीही केले. आयएएस होताच ट्रेनिंग आटोपले आणि योगायोगाने त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले. दोन वर्ष बीडला उपजिल्हाधिकारी, नंतर दोन वर्ष गोंदियाला जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी अशी पदे भूषवून त्या नागपूरला अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून आल्या होत्या. मध्यमवर्गीम मराठी कुटुंबात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे वडील सरकारी नोकरीतच होते. मोठे दोघे भाऊ तेही उच्चशिक्षित झाल्यावर मोठ्या कंपन्यांमध्मे नोकर्या करीत होते. शेंडेफळ असणार्या आश्विनीने हा वेगळा मार्ग निवडला आणि पहिल्याच झटक्यात आयएएस होऊन त्यांनी नोकरीला सुरुवात केली. गत पाच वर्षात त्या या सरकारी नोकरीत स्थिरावल्या होत्या. गेल्या पाच वर्षात त्या जिथे जिथे कामाला गेल्या तिथे राजकीय व्यक्तींशीच त्यांचा संपर्क येत होता. मात्र असे अभ्यासू आणि तितकेच समजूतदार राजकारणी तिच्या पाहण्यात प्रथमच येत होते. त्यामुळेच या व्यक्तिमत्वाचा तिच्यावर चांगलाच प्रभाव पडला होता.


यानंतर अधिवेशन सुरु होईपर्यंत प्रशांत आणि आश्विनी सतत संपर्कात होते. एकूणच सर्वच मुद्यांवर प्रशांतना अपडेट करण्याचे काम आश्विनी खासनीसांनी चांगलेच केले. नंतर अधिवेशन सुरु झाले. अधिवेशना दरम्यान नागपूर जिल्ह्याचे मुद्दे जेव्हा जेव्हा विधानसभेत येत होते तेव्हा तेव्हा संबंधित मंत्र्यांना ब्रीफ करण्यासाठी कलेक्टर ठाकरे आश्विनी खासनीसांनाच मुंबईला पाठवत होते. मग त्यावेळी दिवसभर विधानसभेतल्या अधिकारी गॅलरीत बसून कामकाजाचे निरीक्षण करायचे आणि जरुर असेल तेव्हा चिठ्ठी लिहून मार्शलकरवी संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवायची हे काम त्यांना करावे लागत होते. या काळात सभागृहाच्या कामकाजात त्या प्रशांत देशमुखांचा सक्रिय सहभाग बघत होत्या. त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत, आपल्या अभ्यासू शैलीने मंत्र्यांना अडचणीत पकडण्याचा ते करीत असलेला यशस्वी प्रयत्न हा निश्चितच कोणालाही भावणारा असायचा. त्यामुळे सभागृह संपले की माध्यम प्रतिनिधींचा कायम देशमुखांभोवती गराडा असायचा. पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातल्या काही रेंगाळलेल्या प्रकल्पांबाबत प्रशांत देशमुखांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच अडचणीत आणले होते. त्यांच्या आक्रमक पवित्र्याने आणि अभ्यासू प्रतिपादनाने सत्ताधारी गटातील आमदारही त्यांच्या बाजूने बोलू लागले होते. शेवटी संबंधित मंत्र्यांंनी अधिवेशन संपण्यापूर्वी खास बाब म्हणून तुमच्या मागण्यांसाठी विशेष तरतूद करू असे आश्वासन दिल्यावरच देशमुखांचा सभागृहातील आग्रह थांबला होता. नंतरही देशमुखांचा पाठपुरावा सुरुच होता. त्यामुळे अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी सरकारतर्फे नागपूर जिल्ह्यातल्या रेंगाळलेल्या प्रकल्पांसाठी सरकारने खास बाब म्हणून तत्काळ ६०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला जाईल अशी घोषणा केली. प्रशांत देशमुखांच्या अभ्यासू आणि आक्रमक कार्यशैलीचा हा विजयच होता. सभागृहात सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले. कामकाज संपल्यावर आश्विनी खासनीस सभागृहाबाहेरच्या लॉबीतून निघाल्या होत्या. तितक्यात समोरून प्रशांत देशमुख येतांना दिसले त्यांना बघताच खासनीस मॅडम सामोऱ्या गेल्या आणि बोलायला सुरुवात केली. “अभिनंदन आमदार साहेब, शेवटी तुम्ही जिंकलात”. “हो, मॅडम शेवटी लोकांसाठीच भांडावतर लागतेच ना! तुमची मदत मिळाल्यामुळे मी बाजू चांगली मांडू शकलो इतकेच”. “मी काय आपल्याला डाटा दिला, तो आपण मांडल्यामुळे शेवटी आपल्या जिल्ह्याचा फायदा झाला असे म्हणत आश्विनी खासनीसांनी पुढची गुगली टाकली, आता या सक्सेसबद्दल पार्टी पाहिजे आमदार साहेब”, “हो हो, तुम्हाला पार्टी केव्हाही देता येईल. कुठे द्यायची ते सांगा”. “मला काय कुठेही चालेल, अगदी आपल्या घरी शालिनी मावशींच्या हातचं जेवायला येण्याचीसुद्धा माझी तयारी राहील”. “अरे व्वा हे काम तर तुम्ही फारच सोपं केलं. आता नागपूरला पोहोचलो की पुढच्या आठवड्यात दिवस ठरवून आईशी बोलतो आणि तुमच्या सोबत सहभोजनाचा आनंद घेता येईल आपल्याला” “चालेल साहेब” असे म्हणत आश्विनी खासनीसांनी बोलणे आटोपते घेतले.

अविनाश पाठक

Leave a Reply