ते असे हुकुमशहा आहेत, ज्याला फक्त कौतुक ऐकायचं आहे – असदुद्दीन ओवैसी यांची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली : ४ जानेवारी – शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मेघालयच्या राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील जाहीर केल्यानंतर त्यावरून देशभरात राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. “जेव्हा मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटलो तेव्हा पाच मिनिटांतच माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यांना खूप गर्व होता”, असं मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटल्यानंतर त्यावरून विरोधकांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायला सुरुवात केली आहे. याच मुद्द्यावर हैदराबादमध्ये माध्यमांशी बोलताना एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडलं आहे.
“सत्यपाल मलिक हे एक राज्यपाल आहेत. केंद्र सरकराने त्यांची नियुक्ती केली आहे. ते एका घटनात्मक पदावर आहेत. मी काय सांगतो त्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण किमान राज्यपाल काय सांगतात, त्यावर तरी विश्वास ठेवा. राज्यपाल स्वत: सांगत आहेत की पंतप्रधान सत्य ऐकायला तयार नव्हते”, असं ओवैसी म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना हुकुमशहाशी केली. “जेव्हा राज्यपालांनी पंतप्रधानांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान तुमच्यामुळे शेतकरी मरण पावले, तेव्हा पंतप्रधान संतप्त झाले. यावरून हे सिद्ध होतं की पंतप्रधान सत्य स्वीकारायला तयार नाहीत. यातून पंतप्रधानांचा अहंकार दिसून येतो. ते असे हुकुमशहा आहेत, ज्याला फक्त कौतुक ऐकायचं आहे. ज्याला सत्य आणि टीका ऐकायची नसते”, असं ओवैसी म्हणाले आहेत.
राजकीय समीकरणातूनच केंद्र सरकराने कृषी विधेयके मागे घेतल्याचा दावा असदुद्दीन ओवैसींनी केला. “उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये राजकीय फटका बसू शकतो असं त्यांना वाटलं. म्हणूनच केंद्रानं तीन कृषी कायदे मागे घेतले. निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे राजकीय नाईलाजानेच त्यांनी हा निर्णय घेतला”, असं ओवैसी म्हणाले. तसेच, “वाढती बेरोजगारी, महागाई असे अजून कडू सत्य देखील पंतप्रधान ऐकतील, अशी मला आशा आहे”, असा टोला देखील त्यांनी लगावला

Leave a Reply