जिवंत विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूर : ४ जानेवारी – भद्रावती वनपरिक्षेत्रातील एका खाजगी शेतालगत रस्त्यावर सोमवारी एक वाघीण मृतावस्थेत आढळली. जिवंत विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने ती मृत झाली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नव्या वर्षातील व्याघ्र मृत्यूची ही पहिलीच घटना ठरली आहे. या प्रकरणी वन गुन्हा नोंदविण्यात आलेला असून चौकशी सुरू झाली आहे.
चंद्रपूर वनविभागातील भद्रावती नियतक्षेत्रातील चालबर्डी-कोंढा शिव रस्ता येथे सोमवारी एक वाघीण मृतावस्थेत आढळली. याबाबतची माहिती वनविभागाला मिळाल्यावर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सदर वाघिणीचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वनविभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला.
यावेळी विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) निकिता जे. चौरे वन परिक्षेत्राधिकारी एच. पी. शेंडे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे सदस्य बंडू धोतरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) प्रतिनिधी म्हणून मुकेश भांदककर यांच्या उपस्थितीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ. सुहास रोडे, डॉ. राहुल शेंद्रे यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले. त्यानंतर अग्निदहन करण्यात आले. सदर वाघिणीचे वय सुमारे ५ वर्षे असून तिच्या दात व मिश्या शाबूत आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Reply