घरगुती वादातून भावाने केली बहिणीची हत्या

नागपूर : ४ जानेवारी – कळमेश्वर तालुक्यातील मोहपा गळबर्डी येथे बहीण-भावामध्ये झालेल्या घरगुती वादातून रागाच्या भरात भावाने बहिणीच्या डोक्यावर काठीने प्रहार केल्यामुळे बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी ९ वाजता घडली. उज्ज्वला अर्पित भोजने (वय ३0) रा. पिपळा रोड, नागपूर मृत बहिणीचे नाव असून, शरद विठ्ठल गणोरकर (वय ३२), रा. गळबर्डी मोहपा, ता. कळमेश्वर असे आरोपी भावाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, दोन बहिणी, भाऊ व आई असा परिवार असून, यांच्याकडे २ एकर शेती आहे. शेती ठेक्याने देऊन व्याजाचे पैसे आई घेत होती. शेती विकण्यासाठी व घरगुती कारणावरून नेहमी वाद होत असे. मृत उज्ज्वला भोजने ही आईला भेटण्याकरिता दोन दिवसांपूर्वी मोहपा येथे आली होती. सकाळी ९ वाजता उज्ज्वला घरासमोरील कुंडीमध्ये माती भरत असताना बहीण-भावामध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात भाऊ शरदने बहिणीच्या डोक्यावर काठीने वार केला असता ती बेशुद्ध पडली. तिला उपचाराकरिता सावनेर येथे दवाखान्यात नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून आरोपी शरद याला अटक केली असून, अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मारूती मुळूक, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण मुंडे करीत आहे.

Leave a Reply