ओबीसी समजाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांना किंमत मोजावी लागेल – प्रवीण दरेकर

मुंबई : ४ जानेवारी – ‘ओबीसींवर माझा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते’, असं खळबळजनक वक्तव्य गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने आता यावर पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. ओबीसी समजाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांना किंमत मोजावी लागेल, असं विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.
‘जितेंद्र आव्हाड हे खळबळजनक वक्तव्य करायला माहीर आहेत, अशा वक्तव्याने समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते नेहमी करत असतात. त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी. कारण ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, याची किंमत त्यांना मोजावी लागेल’, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर अशा वक्तव्याने जितेंद्र आव्हाड आपल्या पक्षाला अडचणीत आणण्याचे काम सुद्धा करत आहेत, असेही ते म्हणाले.
‘खरं तर ओबीसींवर माझा फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला फक्त महार आणि दलित समाज होता. कारण ओबीसींना लढायचं नव्हतं. ओबीसींवर ब्राह्मणवादाचा पगडा इतका आहे की, आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहित नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसतं. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येत आहेत. नुसतं घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे. केंद्र सरकारशी दोन हात करावे लागणार आहेत’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

Leave a Reply