वादात मध्यस्ती करायला गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून केली हत्या

वर्धा : २ जानेवारी – वर्ध्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्येची घटना समोर आली आहे. बॉईल अंड्याचे पैसे देण्यावरुन सुरु असलेल्या वाद मिटविण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेनंतर आरोपी इतक्या निर्घृणपणे कसे वागू शकतात? असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर दोन जण फरार आहेत. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.
संबंधित घटना वर्धा तालुक्याच्या वायगाव निपाणी येथे घडली. खरंतर ही घटना बॉईल अंड्याचे पैसे देण्याच्या वादातून घडली आहे. बंडीचालक गणेश त्र्यंबके याच्याकडे आरोपी करणसिंग आणि त्याच्या दोन साथीदारांनी आज सायंकाळी तीन बॉईल अंडी घेतले होते. यादरम्यान बंडीचालक गणेश आणि आरोपी करणसिंग यांच्यात पैसे देण्यावरुन वाद सुरु झाला. यावेळी दोघांमध्ये टोकाचं भांडण सुरु झालं. वाद चालू असल्याचे पाहून समोरच्या पान टपरी चालक चेतनची आई समजावयाला आली. पण आरोपींनी तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
आपल्या आईला आरोपी करणसिंग शिवीगाळ करीत असल्याचे पाहून तिचा मुलगा मृतक चेतन घोडमारे तिथे आरोपींनी समजवायला आला. यावेळी संतापलेल्या आरोपी करणसिंग याने पान टपरी चालक चेतन विष्णू घोडमारे (३२) यालाच चाकूने भोसकले. परिणामी मध्यस्थी करणे चेतनला भोवले. तो प्रचंड जखमी झाला. यावेळी चेतनच्या आईने आक्रोश करायला सुरुवात केली. चेतन रक्तबंबाळ झाला. परिसरातील नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेलं. पण रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच चेतनचा मृत्यू झाला.
संबंधित घटनेमुळे चेतनच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या आईने प्रचंड आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरातील नागरीकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी आता होऊ लागली. या दरम्यान संबंधित घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पोलिसांना आरोपी करणसिंगला बेड्या ठोकण्यात यश आलं. त्याचे सहकारी बबलुसिंग, सिरबंदसिंग हे दोघे फरार आहेत. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास देवळीचे ठाणेदार तिरुपती राणे, परवेज खान, श्रावण ठाकरे, गणेश वैद्य करीत आहेत.

Leave a Reply