ओंजळींतील फुलं : ५ – महेश उपदेव

28 dec mahesh updeo final

आयुष्य खूप रंगानी भरलेले आहे..कॅलिडोस्कोप प्रमाणे दिवसांकडे बघितले की ओंजळीतील ही फुले विलक्षण सुगंधी होतात.
झिरो बजेटमध्ये नोकरी गेल्यानंतर रोजगाराचा प्रश्न माझ्या समोर पडला होता. घरात वडील एकटे कमविणारे व घरात तीन बहिणी, मी सर्व बरोबरीचे शिक्षण घेणारे होतो. तेव्हा आर्थिक परिस्थिती बेताची होती. वडिलांवर आर्थिक ताण येऊ नये, मी माझे शिक्षण ईबीसीत पूर्ण केले.
बास्केटबॉल आम्ही डांबरी कोर्टवर खेळत असल्यामुळे कोणत्याही नामांकित कंपनीचे बूट घातले तरीही बुटाचे सोल झिजून फाटत होते.  हा सर्वच खेळाडूंना प्रश्न पडत होता. तेव्हा बाटा व नॉर्थस्टार कंपनीचे स्पोर्ट शु चांगले असायचे त्यासाठी  आम्हाला ६०० ते १००० रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागायची. आपल्याला खेळामध्ये प्राविण्य मिळवायचे असेल तर बास्केटबॉल मध्ये  बूट आवश्यक होते.


बुटाकरिता नोकरी

बूट घेण्यासाठी घरून वारंवार पैसे मागू शकत नव्हतो, त्याकरिता मला बरेच कष्ट घ्यावे लागले. दुपारी कॉलेजमधून आल्यानंतर  मी एका मुलाला हाताशी घेऊन नुकतेच बाजारपेठेत आलेले टाटा नमक चे पुडे घरोघरी जाऊन तर कधी हातगाडी भाड्याने घेऊन  विविध वस्त्यांमध्ये फिरून विकत होतो. त्यापासून फारसे कमिशन मिळत नव्हते, याला जोड धंदा म्हणून मी पहाटे रामदासपेठ येथून  वृत्तपत्र घेऊन धंतोली परिसरात पेपरची लाईन टाकत होतो. त्याकरिता मला तरुण भारत चे मुख्य  विक्रेता स्वर्गीय विठ्ठलराव मारुळकर यांची मदत झाली. १०० ते २०० पेपर ची लाईन टाकल्यानंतर महिन्याकाठी  १०० ते १५० रुपये मिळत होते. हे पैसे जमा करून स्पोर्ट शु विकत घेत होतो. खेळण्याकरिता   व बाहेरगावी स्पर्धेकरिता  जाण्याकरिता पैसे लागायचे प्रत्येक वेळी घरी पैसे मागायची लाज वाटायची. बाबांच्या चोरून आई तिच्याजवळ जमलेले  पैसे द्यायची. बुटकरीता वेळ पडेल ते काम करून पैसे कमवत होतो. मात्र वडिलांना याची माहिती मिळू नये याची खबरदारी  घेत होतो.
जीएस कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे समाजकारण व राजकारण अंगात शिरल्यामुळे गावात चांगली ओळख झाली होती. सर्व स्तरातील  लोकांशी संपर्क होता. आताची सुदामा  टॉकीज पूर्वी ती सरोज टॉकीज होती. या टॉकीजमध्ये दर बुधवारी नवनवीन सिनेमा लागत होता.  सिनेमा बघण्याकरिता युवक युवतींची गर्दी व्हायची, त्यावेळी सुदामा मध्ये लव्ह स्टोरी आणि कर्ज  हे दोन सिनेमे लागले होते त्याला तुफान गर्दी होती. मी सरोज टॉकीजच्या व्यवस्थापकांशी सेटिंग करून आधीच बाल्कनीच्या तिकीट  विकत घेऊन ठेवत होतो. सुदामा टॉकीज च्या समोर असलेल्या एनआयटी कॉम्प्लेक्समध्ये उभा राहून  तिकीट  ब्लॅक करून बरेच पैसे मिळायचे. हे सर्व प्रकार कुणाला समजू नये तसच बाहेर मी काय करतो हे घरच्यांना कळू नये  याची विशेष खबरदारी घ्यायचो.


आणि,डॉ. देवराव पावला!

धरमपेठ मधील झेंडा चौकात त्यावेळी देवराव नावाचा मोची बसायचा तो आमच्या करीता देव होता. स्पोर्ट शु फाटले किंवा सोल झिजले कि  बूट त्याच्याजवळ घेऊन जायचो त्या बुटावर तो सर्जरी करून सोल चिपकवून द्यायचा. टायरचे सोल लावल्यामुळे  शु लवकर झिजत नव्हते. त्याच्या भरवश्यावर आम्ही कितीतरी स्पर्धा जिंकल्या बिचारा देवराव कधी आमच्याजवळ पैसे नसले तरीही उधारीमध्ये सोल लावून द्यायचा . त्याची मदत आम्ही आजही विसरू शकत नाही. टायरच्या  सोल मुळे  बूट वजनी होत होते. त्यामुळे धावतांना त्रास व्हायचा ही  तक्रार आम्ही खेळाडूंनी डॉ. देवराव कडे केली.  नंतर त्याने आमच्यासाठी एअरसोल शोधून आणले. एअरसोल लावल्यामुळे बूट हलके व्हायचे व धावतानाही त्रास होत नव्हता.  असे अनेक अनुभव आम्हा खेळाडूंना रोज येत  होते. देवराव मुळे खेळाडूंना होणारी मदत मोठी मोलाची होती.  आमच्या बुटवर सर्जरी करत असल्यामुळे सर्व खेळाडू त्याला डॉक्टर म्हणायचे.
कोणत्याही गावात खेळायला जायचे असेल तर रेल्वे तिकिटाकरिता आमच्याजवळ पुरेसे पैसे नसायचे. आम्ही कॉलेजमधून कन्सेशन  जमवून प्रवास करीत होतो. रेल्वेच्या थर्ड क्लासमधून आम्ही प्रवास करायचो. मुंबईला जायचे असेल तर नागपूरमधून सुटणाऱ्या  दादर एक्सप्रेस मध्ये एक तास पहिले जाऊन थर्ड क्लास मधील बर्थ पकडून ठेवायचो. नाही जागा मिळाली तर दोन बर्थमधील  जागेत वृत्तपत्र टाकून झोपायचो. एवढा खडतर प्रवास केल्यानंतरही दुसऱ्या दिवशी सकाळी सामना खेळायचो.  स्पर्धा जिंकण्याची आमच्यामध्ये एक जिद्द निर्माण झाली होती. त्यातून आम्ही  नागपूर बाहेर बऱ्याच स्पर्धा  जिंकल्या. स्पर्धा जिंकल्यानंतर मिळणाऱ्या रोख रकमेतून आमची नवीन किट तयार करीत होतो.
एकीकडे खेळणेही सुरु होते. शिक्षणाबरोबर नोकरीसाठी धडपड सुरु होती. मार्च च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आम्ही स्पर्धा खेळात राहायचो.  त्यानंतर अभ्यासाला लागायचो. सीताबर्डीवरील भैय्याजी सोनी, गुल्हाने सर, पवनीकर सर, बबनराव तायवाडे सर  आमच्यासाठी देव होते. त्यांच्याकडे आम्ही अकाउंट आणि स्टॅटिस्टिक च्या क्लासला जायचो. सर्व मुलांचा अभ्यासक्रम झाल्यानंतर आम्ही क्लासला गेल्यामुळे या गुरुजनांनी कधी कुरबुर केली नाही. सर्वांचा अभ्यासक्रम संपलेला असायचा, आणि आमचा सुरु व्हायचा. दोन महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करून आम्ही दिले ते पैसे घेऊन आम्हाला या गुरुजनांनी मार्गदर्शन केले.  रेग्युलर  विद्यार्थ्यांपेक्षा आम्ही जास्त गुण घेऊन उत्तीर्ण व्हायचो. याचा आनंद गुरुजनांना असायचा.

कौशिकसरांचे मार्गदर्शन

जीएस कॉमर्स कॉलेजच्या ग्रंथालयाचे प्रमुख स्वर्गीय गोपाळराव कौशिक व शंकर झाडे हे आमचे खरे हितचिंतक होते. गोपाळराव कौशिक म्हणजे एबीपी माझाची नागपूरची प्रतिनिधी सरिता कौशिक हिचे पिताश्री होय. कौशिक सरांकडे  आम्ही कोणत्या लेखकांची पुस्तके वाचायची याची माहिती मिळत होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सर्व विद्यार्थी ग्रंथालयात पुस्तके परत  करीत होते तर आम्ही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अभ्यासाकरिता पुस्तके घेऊन परीक्षेचा अभ्यास करीत होतो.  एप्रिल – मे मध्ये परीक्षा संपल्या की, पुस्तके परत करीत होतो. पण कौशिक सरांनी कधी तक्रार केली नाही.  त्यांचा आमच्यावर इतका विश्वास होता की, परीक्षा संपल्यानंतर न मागता पुस्तके ही  मुले जमा करतील.
माझ्या आयुष्यात  बरेच चढ-उत्तर आले, आधीही हिम्मत हरलो नाही. परिस्थितीला तोंड देत त्याचा सामना करीत दुसरा दिवस कसा चांगला जाईल  हे ठरवूनच काम करीत होतो. कधी मागे वळून बघायचे नाही हे मनाशी ठरवून टाकले होते. कॉलेजमधून आम्हाला  चांगली साथ मिळाली. खेळाडू असल्यामुळे कॉलेजमध्ये आमचा रेकॉर्ड  चांगला  होता.

पेनचा छंद जडला

बास्केटबॉल खेळताना मला पेनचा छंद जडला. लहानपणी एका-एका पेनाकरिता मर खावा लागायचा शाईच्या पेन ची निब तुटली तर दुसरी निब  लावायला पैसे नसायचे. कधी पेन्सिलने तर कधी मित्राकडून  पेन उधार घेऊन अभ्यास पूर्ण करावा लागत होता. आपल्याजवळ छान पेन असावा असे लहानपणापासून वाटायचे पण परिस्थितीमुळे ते कधी शक्य होत नव्हते. बास्केटबॉलचा पंच झाल्यानंतर विविध स्पर्धेकरिता विविध ठिकाणी व परप्रांतात जावे लागत होते. स्पर्धेत पंच म्हणून काम केल्यानंतर  प्रत्येक मॅचनुसार मानधन मिळायचे. या मानधनातून  मी पेन खरेदी करू लागलो. हळूहळू हा छंद वाढतच गेला.  आजमितीला माझ्याजवळ ९ हजारांपेक्षा जास्त पेनचा संग्रह आहे. विविध देशातील नामांकित कंपनीचे पेन  माझ्या संग्रही आहे.  ५ रुपयापासून २५ हजार रुपयांपर्यंत पेन मी खरेदी केला आहे. हीच माझी खरी संपत्ती आहे, माझा हा छंद   पाहून  माझ्या मित्रांनाही कुतुहूल वाटायचे माझा कोणताही मित्र अथवा मैत्रीण विदेशात किंवा अन्य ठिकाणी फिरायला गेले तर  ते माझ्यासाठी आठवणीने आगळावेगळा पेन आणतात. हाच माझा ठेवा आहे.

जय महाराष्ट्र

महेश उपदेव 

Leave a Reply