हा विजय भाजपच्या मुंबई महानगरपालिकेतील विजयाची नांदी – आशिष शेलार

मुंबई : ३१ डिसेंबर – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील विजय हा तर भाजपच्या मुंबई महानगरपालिकेतील विजयाची नांदी असल्याचे वक्तव्य आमदार आशिष शेलार यांनी केले. या विजयामुळे नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात अजूनही आपले नाणे खणखणीत वाजत असल्याचे दाखवून दिले. जिल्हा बँकेच्या १९ पैकी १० जागांवर भाजपप्रणित सिद्धिविनायक पॅनलचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे आता जिल्हा बँकेवर नारायण राणे यांचे एकहाती वर्चस्व असेल. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी मालवणीतून ट्विट करत महाविकासआघाडीला लक्ष्य केले. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…, अशा शब्दांत त्यांनी महाविकासआघाडीची खिल्ली उडविली.
तसेच सिंधुदुर्गातील विजय म्हणजे मुंबईतील विजयाची नांदी असल्याचा दावा शेलार यांनी केला. हा निकाल नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. अमित शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत, असे शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply