ओंजळीतील फुलं : ४ – महेश उपदेव

28 dec mahesh updeo final

१९७२ मध्ये महाल सोडून आम्ही राणाप्रताप नगरमध्ये राहायला आलो. पण महालातल्या आठवणी विस्मरणात जात नव्हत्या. याच दरम्यान बाबांचं प्रमोशन झालं. खादी ग्रामोद्योग अधिकारी म्हणून त्यांची अमरावतीला बदली झाली. आम्ही अमरावतीत आलो. नागपूर सोडल्याची रुखरुख सगळ्यांनाच होती.
अमरावतीच्या मालटेकडीनजिक श्यामनगरात आम्ही घर भाड्याने घेतले. मला सायन्स स्कोर शाळेत प्रवेश मिळाला. तेथेही मी आपले मित्रमंडळ जमविले. रुख्मिणी नगर येथे संजय सदन, निशिकांत काळे, विलास बडोले, मोहन सोलीव हे मित्र भेटले. मालटेकडीवर कोण लवकर चढतो, यावर आमची पैज लागायची. ती एक वेगळीच मजा होती. शाळेत तुषार बापट नावाचा मित्र भेटला. तो कॅम्प परिसरात राहत होता. तेथेही मित्रमंडळ बहरले क्रिकेट, हॉकी खेळायला लागलो.
हनुमान व्यायामशाळेचे प्रमुख प्रभाकरराव वैद्य हे बाबांचे मित्र होते. त्यामुळे व्यायाम शाळेत जायला लागलो. तेथे माझी ओळख बास्केटबॉल प्रशिक्षक खुपसिंग व सुभाष शर्मा यांच्याशी झाली. हे मित्रत्वाचे नाते आजही कायम आहे. एक-एक मित्र गोळा करत असतानाच लगेच दुसऱ्या वर्षी बाबांची बदली त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे वर्धा इथं झाली. माझे बाबा ज्या शाळेत शिकले, त्या शाळेत, म्हणजे न्यू इंग्लिश शाळेत मला प्रवेश मिळाला. एक खासियत म्हणजे त्या शाळेचे माजी मुख्याध्यापक माझे आजोबा दादाजी उपदेव होते. त्यांचा दरारा खूप होता. त्यांना बघितले की, किंवा त्यांनी का रे पोऱ्या असा शाळेच्या व-्ह्यांड्यातुन आवाज काढला तरी विद्यार्थ्यांची चड्डी ओली व्हायची अश्या अनेक गोष्टी शाळेत प्रवेश घेतल्यानंतर समजल्या.
नवीन शाळा, नवीन वातावरण, नवीन मित्र मला अनुभवायला मिळाले. गांधी जिल्ह्यात शाळेत एक वेगळाच नियम होता. शाळकरी मुलांना डोक्यात गांधी टोपी घालणे कंपलसरी होते. पांढरा शर्ट, काळी हाफपॅण्ट आणि गांधी टोपी घालूनच शाळेत यावे लागत होते. टोपी घातली नाही तर सर्व विद्यार्थ्यांसमोर शाळेत शिक्षा व्हायची. येथेही माझा खोडकरपणा सुरूच होता. शाळेची प्रार्थना पटांगणात असलेल्या मोठ्या चिंचेच्या झाडाखाली व्हायची. हमखास मी टोपी घरीच विसरायचो. आता आपल्याला शिक्षा होणारच म्हणून प्रार्थनेकरिता रांगेत उभा असताना एखादया विद्यार्थ्याची टोपी उडवून आपल्या डोक्यात घालून घ्यायचो. सर्वांच्या पांढऱ्या टोप्या असल्यामुळे कुणालाच ओळखता येत नव्हते. ज्याच्या डोक्यात टोपी नाही त्याला शिक्षा व्हायची. ही एक वेगळीच गंमत रोज शाळेत व्हायची. शाळा सुटल्यानंतर त्या मुलाला टोपी इमानदारीने परत करत होतो. त्यामुळे कुणीही नाराज होत नव्हते.
वर्गात डांबरट मुलांची एक गँग होती. त्यात मी, माजी आमदार अशोक शिंदे, संजय उमाठे, विकास काळी, विजय मानापुरे, मनोज कत्रोजवार, राजेंद्र मिस्कीन यांचा समावेश होता

विनोबाजींनी केली शिक्षा

१९७५ मध्ये दांडी मारून आम्ही चार पाच मित्रांनी पवनारला जायचे ठरवले. तेव्हा आमच्या जवळ सायकली नव्हत्या. शिवाजी चौकातून दोन सायकली भाड्याने घेतल्या. पाच मित्र डबल पायडल मारत पवनारला गेलो. संजय उमाठे हा पवनारचा रहिवासी होता. आम्हाला आचार्य विनोबा भावे यांना बघायचे व भेटायचे होते. त्यांची भेट कशी होईल याची उत्सुकता होती. आम्ही जेव्हा पवनार आश्रमात पोहोचलो तेव्हा विनोबा भावे यांची विश्रांतीची वेळ होती. आता काय करायचे, असा प्रश्न पडला. भूकही जोरदार लागली होती. आश्रमातच आम्हाला पेरूची बाग दिसली. मग आमच्या खोडकारपणामुळे आम्हाला काही राहवले गेले नाही. आम्ही चोरून पेरू तोडले आणि झाडाखालीच खात बसलो. हे एका आश्रमातील सेवकाने बघितले. तो आमच्यावर चांगलाच रागावला. त्यानंतर आम्हा ५ जणांना आचार्य विनोबा भावे यांच्याकडे पकडून घेऊन गेला . आता आपल्याला शिक्षा होणार हे आम्हाला कळून चुकले होते.
पांढरे स्वच्छ धोतर, पांढरी शुभ्र दाढी, गोल फ्रेमचा चष्मा घालून विनोबाजी आपल्या आसनावर बसले होते. त्यांच्या समोर सेवकांनी आम्हाला उभे केले. या पाच जणांनी आपल्या बागेतील पेरू चोरून खाल्ले असे त्याने सांगितले. त्यानंतर शांतपणाने विनोबाजींनी मला नाव विचारले, मी महेश भालचंद्र उपदेव नाव सांगताच ते म्हणाले, दादाजी.. अण्णाजी उपदेव हे तुझे कोण आहेत.? मी थोडा वेळ गांगरून गेलो. विनोबाजी आजोबांना ओळखत होते. ते माझे मित्र आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर विनोबाजींनी आम्हा पाच जणांना १०८ वेळा श्रीराम – श्रीराम लिहिण्याची शिक्षा सुनावली. आम्ही शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्यांना तो कागद दाखविला माझे हस्ताक्षर पाहून ते खुश झाले. आम्ही पेरू चोरले नसते तर आमची तुमच्याशी भेट झाली नसती, असे वाक्य माझ्या तोंडून निघाले. ते गालात हसत म्हणाले, परत असे करायचे नाही. त्यांनी मला व माझ्या मित्रांना गीताईचे पुस्तक भेट दिले. त्यांनी दिलेली शिक्षा व भेट मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.

त्या काळात आचार्य विनोबाजींनी प्रदूषणाचा आणि पर्यावरणाचा धोका ओळखला होता. आश्रमाच्या शेजारी असलेल्या नदीवर त्यांनी गणपती, व दुर्गा विसर्जन करू दिले नव्हते. खऱ्या रूपाने पर्यावरण त्यांनी जपले होते. पर्यावरणासाठी कठोर नियम केल्यामुळेच तेथे उद्योग येऊ शकले नाही, हे खरे वास्तव आहे.

बास्केटबॉल खेळायला सुरुवात

न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये मी खऱ्या रूपाने बास्केटबॉल खेळायला सुरुवात केली. बाबा झलके यांनी आमच्या शाळेतच प्रताप बास्केटबॉल क्लबची स्थापना केली. या क्लबचा मी छोटा सदस्य होतो. या क्लबने अनेक दिग्गज बास्केटबॉल खेळाडू घडवले. तसेच विदर्भात बास्केटबॉल क्लब प्रसिद्धीला आला.

जय महाराष्ट्र

महेश उपदेव

Leave a Reply