एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या घटनेत नातवासह आजी-आजोबांचा मृत्यू

बुलडाणा : ३१ डिसेंबर – बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील एका गावात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या घटनेत नातूसह आजी-आजोबांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकाच घरात एकाच दिवशी तीन चिता पेटल्या आहेत. या तिहेरी घटनेनं गावात शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
वैभव विनोद मानकर असं मृत पावलेल्या १८ वर्षीय दिव्यांग नातवाचं नाव असून तो मोताळा तालुक्यातील जनुना येथील रहिवासी होता. बुधवारी त्याचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला होता. नातवाच्या मृत्यूची बातमी कळताच, खामगाव तालुक्यातील उमरा येथील रहिवासी असणारे आजोबा गोपाल भोजने (वय-५५) नातवाच्या अंत्यसंस्कारासाठी जनुना येथे येत होते. दरम्यान गावातील एका दुचाकीने त्यांना जोरदार धडक मारली. या अपघातात आजोबा भोजने गंभीर जखमी होऊन घटनास्थळी पडले.
आसपासच्या लोकांनी तातडीने त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना आजोबा भोजने यांनी अखेरचा श्वास घेतला. याचवेळी जनुना याठिकाणी नातवावर अंत्यसंस्कार सुरू होते. वैभव याच्यावर अंत्यसंस्कार करून परत येईपर्यंत, आजोबा गोपाल भोजने यांच्या मृत्यूची माहिती समोर आली. त्यामुळे स्मशानभूमीतून परतलेले नातेवाईकांनी पुन्हा लगेच आजोबांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.
या घडामोडी घडत असताना दु:ख सहन न झाल्याने वैभवच्या आजीचा देखील अचानक मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकाच दिवशी एकाच घरातून तीन चिता पेटल्या आहेत. नातवासह आजी आजोबांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गावात शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Leave a Reply