आता काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण

मुंबई : ३१ डिसेंबर – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. अशावेळी नेतेमंडळींच्या मुलांचे विवाह सोहळे मात्र मोठ्या थाटात पार पडताना दिसत आहेत. मात्र, त्याचा फटका आता दिसून येत आहे. कारण, हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी झालेला एक एक नेता आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करुन आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी’, असं आवाहन थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलंय.
हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांचा विवाहसोहळा 28 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडला. या लग्नसोहळ्याला अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. आता हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागणी झाल्यानं आता या विवाहसोहळ्याला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply