संपादकीय संवाद – शरद पवारांवर का विश्वास ठेवायचा?

महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी आज एक खळबळजनक विधान केले आहे. २०१९ मध्ये शिवसेनेने अडवणुकीची भूमिका घेतल्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार बनवावे, अशी ऑफर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला दिली होती, आणि भाजपच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारा भिन्न असल्यामुळे तेच कारण सांगून आपण हा प्रस्ताव नाकारला अशी माहिती नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना पवारांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे. भारतीय जनता पक्षाने या विधानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवारांच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
पवारांच्या या खळबळजनक विधानाचा पंचनामा करतांना आमच्या मनात काही वेगळेच मुद्दे आलेले आहेत. पवार म्हणतात की, भाजपची आणि आमची विचारधारा भिन्न आहे, त्यामुळे आम्ही सरकार बनवायला नकार दिला होता. इथे पंचनामाला प्रश्न पडला आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा एक होती काय? शिवसेना महाराष्ट्रात उभी झाली ती परप्रांतीयांना महाराष्ट्रातून हद्दपार करत मराठी तरुणांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्यांचे मूळ असलेली काँग्रेस यांना सेनेची ही भूमिका कधीच मान्य नव्हती. १९८५ नंतर शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका घेतली, पवार आणि काँग्रेस पक्षाने तर कायम हिंदुत्वाला विरोध करीत सर्वधर्मसमभावाचा मंत्र आळवला त्यातही अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन आणि हिंदूंना लाथा हाणने हेच त्यांचे धोरण होते, तरीही पवारांनी सत्तेसाठी शिवसेनेशी हातमिळवणी केलीच ना. इथे विचारधारेचा प्रश्न का आडवा आला नाही? याचा खुलासाही पवारांनी करायला हवा.
भिन्न विचारधारेच्या पक्षासोबत मांडीला मांडी लावून बसण्याची पवारांची ही काही पहिलीच वेळ नाही, १९७८ मध्ये काँग्रेसमधून बंड करून शरद पवारांनी महाराष्ट्रात सरकार बनवले त्यावेळी जनता पक्ष त्यांच्यासोबत होता. त्यावेळचा महाराष्ट्रातला जनता पक्ष आजच्या भाजपपेक्षा फारसा वेगळा नव्हता. हिंदुत्ववादी विचारधारा असणारे उत्तमराव पाटील, डॉ. प्रमिला टोपले, अर्जुनराव कस्तुरे असे अनेक हिंदुत्ववादी विचारधारेचे लोक पवारांच्या या मंत्रिमंडळात सहभागी झाले होते. इथे पवारांना सत्ता महत्वाची होती, विचारधारेला त्यांनी फाट्यावर मारले आणि वयाच्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळवला. त्यावेळी तुमची विचारधारा कुठे गेली होती शरदराव?
१९९९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसला बहुमत मिळाले तर सोनिया गांधी पंतप्रधान होणार हे निश्चित झाले होते, ही बाब लक्षात घेत पवारांनी विदेशीचा मुद्दा पुढे करत काँग्रेस फोडली, नंतर त्याच काँग्रेससोबत पवारांनी महाराष्ट्रात सरकार बनवले त्याच काँग्रेसच्या केंद्रीय मंत्रिमंडळात पवारही १० वर्ष मंत्री राहिले. इथेही पवारांनी विचारधारेला तिलांजलीच दिली होती.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता, नाशिकमध्ये केलेले वक्तव्य ही पवारांची लोणकढी थाप आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे पवारांवर किती विश्वास ठेवायचा हे महाराष्ट्रातील जनतेनेच ठरवायचे आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply