मनमोहन सिंग यांच्याइतका इतका निष्कपट मनाचा पंतप्रधान, आयुष्यात पाहिला नाही – संजय राऊत

नाशिक : ३० डिसेंबर – लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर मनमोहन सिंग यांच्याइतका इतका निष्कपट मनाचा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या काळात कोणावरही सूडाची कारवाई झाली नाही. ज्यांच्यावर कारवाई होणार होती तेव्हा मनमोहन सिंग यांनी त्यात पुढाकार घेतला असंही संजय राऊत म्हणाले. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“स्वत: शरद पवारांनी ज्यांचे घोडे आज उधळले आहेत त्यांना वाचवलं आहे. राजकारणात संयम महत्वाचा असतो. सत्तेचा आणि राज्यघटनेचा गैरवापर करु नये. राजकारणात मधांद हत्तीप्रमाणे उधळू नये, हत्तीही कोसळतात,” असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला. शऱद पवारांनी मनमोहन सिंग यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत बोलत होते.
काँग्रेसच्या काळात सूडाचे राजकारण होत नसल्याचे नमूद करून पवार म्हणाले, की “गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारवर सर्वाधिक हल्ले चढवले. त्यामुळे गुजरात आणि दिल्लीमध्ये अंतर वाढले होते. मोदी यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी माझ्याशिवाय कोणीही इच्छुक नव्हते. राजकीय मतभेद असले, तरी राज्याच्या विकासाच्या आड येता कामा नये, ही मी मांडलेली भूमिका तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मान्य केली. काँग्रेसमधील काही नेत्यांनी टोकाची भूमिका घेतली होती. मात्र चौकटीच्या बाहेर जाऊ नये आणि सूडाचे राजकारण करता कामा नये या भूमिकेवर मी आणि डॉ. मनमोहनसिंग ठाम होतो”.
“मात्र आता जे काही सुरू आहे ते ठीक नाही. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांपैकी एकच आरोप विचार करण्याजोगा आहे. देशमुख यांनी एका कंपनीकडून चार कोटी रुपये घेतले. ही रक्कम त्यांच्या शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा झाली, सत्तेचा गैरवापर करून ही रक्कम घेण्यात आली, अशी माहिती तपास यंत्रणेची आहे. मात्र देशमुख यांच्यावर सातशे पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या वरून व्यक्ती आणि पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती टोकाचा आहे हे दिसते,” असंही शरद पवार म्हणाले.

Leave a Reply