नागपूरच्या १० वर्षीय बालकाने स्वतःच्या शब्दात लिहिली संपूर्ण भगवद्गीता, इंडिया आणि आशिया बुकमध्ये नोंद

नागपूर : ३० डिसेंबर – ज्या वयात मुले मोबाइल गेम खेळण्यात दंग असतात, त्या वयात शहरातील दहा वर्षांच्या बालकाने संपूर्ण भगवद्गीता स्वत:च्या शब्दांत लिहिण्याचा विक्रम केला आहे. काव्य अग्रवाल असे त्याचे नाव. काव्यने ही ‘किडटॅस्टिक’ नावाची भगवद्गीता लिहिली असून त्याची नोंद इंडिया आणि आशिया बुकमध्ये करण्यात आली आहे.
सर्वात लहान वयात भगवद्गीता लिहिण्याचा विक्रम काव्यने केला आहे. केवळ दोन महिन्यांत त्याने लिखाणाचे काम पूर्ण केले. त्याने ‘किडटॅस्टिक’ पुस्तकात भगवद्गीतेच्या श्लोकांचा अर्थ सांगितला. अध्यायांचे स्वत:च्या शब्दांत भाषांतरदेखील केले. आपण भगवद्गीतेतून काय धडा घेऊ शकतो, याचे लिखाण काव्यने आपल्या पुस्तकात केले आहे. बुधवारी झालेल्या पत्रपरिषदेत काव्यने ही माहिती दिली.
‘अगदी सुरुवातीपासून मला धार्मिक गोष्टींत रस होता. एका कार्यशाळेत भगवद्गीतेविषयी माहिती मिळाली. त्यानंतर संपूर्ण भगवद्गीतेचे वाचन करून आपल्या भाषेत ती पुस्तकरूपात लिहिली. भगवदगी्तेचे लेखन करण्यात आई रश्मी अग्रवाल आणि बाबा राज अग्रवाल यांनी मदत केली’, असे काव्यने सांगितले.
काव्यच्या विक्रमाची नोंद सप्टेंबरमध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तर ऑक्टोबरमध्ये आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्ससाठीची प्रक्रिया सुरू असल्याचे राज अग्रवाल यांनी ‘मटा’ला सांगितले. काव्यला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
काव्यने केवळ पुस्तकाचे लिखाणच केलेले नाही, तर पुस्तकाचे डिझाइनदेखील स्वत: केले आहे. मुखपृष्ठ त्याने स्वत: फोटोशॉपवर तयार केले. यात रंगीत चित्र, आकर्षक पृष्ठसज्जा, विशेष फॉन्ट यांचा वापर करण्यात आला आहे. सध्या पुस्तक इंग्रजी भाषेत उपलब्ध असून येत्या काळात इतर भाषांत ते उपलब्ध करून देण्यात येईल. भविष्यात ऑडियो बुकसुद्धा काढण्याचा विचार सुरू आहे, असे काव्य म्हणाला.

Leave a Reply