राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची चर्चा करणारे मूर्ख – संजय राऊत

मुंबई : २९ डिसेंबर – राज्यातील महाविकास आघाडीने राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठी जी कारणे लागतात त्यातील एकही कारण शिल्लक ठेवलेले नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. पत्रकार परिषदेत बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल आणि सरकार यांच्यातील ताणलेल्या वादावर भाष्य केले. राज्यपालांनी निरोप पाठवला असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. याचा अर्थ तुम्ही राज्यपालांचा अपमान करता. राष्ट्रपती राजवट राज्यात लागू करण्यासाठी जी कारणे लागतात; त्यातील एकही कारण शिल्लक ठेवलेले नाही. त्यामुळे राष्ट्रपती आता वाट बघत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची चर्चा कोण करतं मला माहिती नाही. अशी चर्चा कोणी करत असेल तर ते मूर्ख आहेत. राज्यात बहुमताचे सरकार असून १७० आमदारांचा पाठिंबा आहे. अशा किरकोळ गोष्टीवरुन कुणी राष्ट्रपती राजवट लावण्याची कुणी भाषा करत असेल तर त्यांनी देशाची राज्यघटना एकदा वाचून यावी,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यामध्ये, विधिमंडळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत आहे. राज्य सरकार स्थिर ठेवण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले आहेत, त्यामुळे जे लोक अस्वस्थ असतात ते अशा प्रकारची विधानं करत असतात,” असा टोला शरद पवारांनी लगावला होता.
दरम्यान, राज्यकारभारात एकंदरीत सावळागोंधळ सुरू असल्याची टीकाही पाटील यांनी केली. कोण आजारी आहे. कोण तुरुंगात आहे. राज्यात सगळय़ात गोंधळ सुरू आहे. जनतेसमोर गेलात की कळेल की लोक कोणासमवेत आहेत ते. केवळ संजय राऊत हेच सतत प्रवक्ते असल्याप्रमाणे विधान करत असतात. इतर सर्वाना बाजूला केले आहे. यातून सेनेतील गोष्ट बाहेर पडेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

Leave a Reply