मी महात्मा गांधींना संत आणि राष्ट्रपिता मानत नाही, नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ विष्णूचे अवतार – कालिचरण महाराज

रायपूर : २८ डिसेंबर – छत्तीसगडमधील रायपूर येथे धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये महाराष्ट्रातील संत कालीचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला. तसेच छत्तीसगड पोलिसांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल केला. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींना शिव्या दिल्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही, असं म्हटलंय. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भगवान विष्णूचा अवतार देखील म्हटलंय.
वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी हजेरी लावली. यावेळी अँकरने त्यांना विचारले की, राष्ट्रपिता महात्मा गांधींना तुम्ही शिवीगाळ केली? हे खरे आहे का? प्रत्युत्तरादाखल कालीचरण म्हणाले, “मला गांधींना शिव्या दिल्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. शिव्या रागाने बाहेर येतात, माझ्या मनातल्या वेदना जाग्या झाल्या, त्यामुळे मी ते बोललो.”
कालीचरण म्हणाले की, “मी महात्मा गांधींना संत आणि राष्ट्रपिता मानत नाही. त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्वासाठी काय केले? एकच धर्म डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले. त्यांनी जनतेचा विश्वासघात करण्याचे कृत्य केले होते.” यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींची पूजा करतात आणि तुम्ही त्यांना शिवीगाळ करत आहात? असं विचारलं असता “मी पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी आदित्यनाथ यांना भगवान विष्णूचा अवतार मानतो,” असं ते म्हणाले.
कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल दिलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. “गांधींना शिवीगाळ केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही. देशाच्या पंतप्रधानपदासाठी सरदार पटेल यांना मते मिळाली होती आणि एकही मत नेहरूंना नव्हते, तरीही नेहरूंना पंतप्रधान का केले,” असे कालीचरण महाराज म्हणाले.
“घराणेशाहीची मुळे पसरवणाऱ्या गांधींनी काँग्रेसच्या इतरांना निराश केले. सरदार पटेल यांच्याकडे पंतप्रधानपद असते तर भारत सोन्याचा पक्षी झाला असता आणि भारत जगतगुरू झाला असता. भारत अमेरिकेपेक्षा मोठी शक्ती बनला असता. गांधींनी हा विश्वासघात केला, त्यामुळे माझ्या मनात गांधींबद्दल तिरस्कार आहे. गांधी हे घराणेशाहीचे जनक आहेत, राष्ट्रपिता नाहीत,” असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे.
“स्वातंत्र्य लढ्यात फाशी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी 80 टक्के शिख लोक आहेत. गांधींनी काठीही खाल्ली नाही. सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग यांची फाशी ते थांबवू शकले असते. पण त्यांनी थांबवले नाही म्हणून मी गांधींचा तिरस्कार करतो,” असे कालीचरण म्हणाले.
“गांधींचे सर्वात मोठे शस्त्र उपोषण हे होते, पण त्यांनी ते केवळ हिंदूंच्या विरोधात वापरले. फाळणी झाली तेव्हा गांधी हयात होते. त्या हिंसाचारात लाखो कोटी हिंदू मारले गेले, एकाच दिवसात २७ लाख लोक मारले गेले. इकडे गांधी पाकिस्तानला ५५ कोटी मिळावेत म्हणून उपोषण करत होते,” असेही कालीचरण म्हणाले.

Leave a Reply