भूखंडाचे खोटे कागदपत्र तयार करून घेतले १ कोटी २५ लाखांचे कर्ज

नागपूर : २८ डिसेंबर – नागपूर शहरातील बजाननगर येथील सव्वा कोटीच्या भूखंडाचे खोटे कागदपत्रे तयार करून त्यावर बँकेकडून लोन मिळविले. त्या कर्जाची परतफेड करण्यात आली नाही. त्यामुळे बँकेने कर्जवसुलीसाठी त्या भूखंडाचा लिलाव केला. याप्रकरणी खऱ्या भूखंड मालकाने सदर प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी २0१४ ते आजपर्यंत आरोपी स्वप्निल प्रभाकर भोंगाडे (रा. फ्लॅट नंबर १0३, बी विंग, जयंती मेन्सस ७, बेसा), शिरीष प्रभाकर भोंगाडे (रा. मनीषनगर), संजय विठोबा उमाटे (रा. २0२, प्रभुसाई अपार्टमेंट, नरेंद्रनगर), दिनेश गोपाल ढोके (रा. टाकळी सिम, हिंगणा रोड), पराग भोसले (रा. संघ बिल्डिंगजवळ, महाल), अनिता पराग भोसले (रा. संघ बिल्डिंगजवळ, महाल), नरेश मौदेकर (रा. राऊत चौक), यशवंतसिंग सक्करवार (रा. शांतीनगर), बँकेच्या या तत्कालीन शाखा व्यवस्थापक व कर्ज शाखेचे ९ पदाधिकारी यांनी संगनमत करून फिर्यादी शीला मनोहर कराडे (वय ८0, रा. द ट्रिज, एम / ६0२, फेज २, पिरोजशानगर, विकोळी पूर्व, मुंबई) यांच्या पतीच्या मालकीचा असलेला बजाजनगर पोलिस ठाणे हद्दीतील फ्रेंड्स को-ऑप सोसा., राणाप्रतापनगर, आरपीटीएसमागे येथील भूखंडाचे खोटे व बनावट दस्तऐवज तयार केले. ते कन्यका नागरी सहकारी बँक लि. चंद्रपूर, शाखा सीताबर्डी, नागपूर येथे गहाण ठेवून त्यावर १ कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि ते कर्ज परत केले नाही. परिणामी, बँकेने सदर भूखंडाचा लिलाव केला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४२0, ४0९, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Leave a Reply