पेंच व्याघ्र प्रकल्पात आढळला ‘टी-३५’ वाघिणाचा मृतदेह

भंडारा : २८ डिसेंबर – राज्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘टी-३५’ वाघिणाचा मृतदेह आढळून आला आहे. व्याघ्र प्रकल्पातील सालेघाट रेंजमधील पाथर बीटमधील पाहणी दरम्यान या वाघिणीचा मृतदेह दिसून आला.
काही असामान्य हालचालीचे वाघिणीचे व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर, आज एक निरीक्षण पथक संबंधित भागात पाठवण्यात आले होते. या पथकाला त्या ठिकाणी वाघिणी मृतावस्थे आढळून आली. विशेष म्हणजे वाघिणीच्या अंगावर कुठलीही जखम दिसून आली नाही.
पोस्टमॉर्टम टीम घटनास्थळाकडे रवाना झालेली आहे. पोस्टमॉर्टम नंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकते. याचबरोबर पथक इतर सर्व संभाव्य कारणांचा देखील शोध घेत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या सहा महिन्यांमध्ये २३ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. विजेचा धक्का, शिकार आणि विषबाधेमुळे झालेल्या मृत्यूच्या बाबतीत, राज्य सरकारने एनसीटीएच्या निकषांनुसार आवश्यक कार्यवाही केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरद्वारे दिलेली आहे.

Leave a Reply