अकोल्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीने नागरिकांची तारांबळ

अकोला : २८ डिसेंबर – भारतीय हवामान विभागाने २८ ते ३० डिसेंबर दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास अकोल्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि गारपीट झाली आहे. वेगवान वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसाने अचानक एन्ट्री मारल्याने शहरातील बाजारपेठांध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे.
आज सकाळपासूनच अकोला जिल्हा आणि परिसरात वातावरणात मोठा बदल जाणवत होता. याठिकाणी सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली होती. तसेच काही दिवसांपासून कहर करणारी कडाक्याची थंडी सुद्धा कमी झाली होती. त्यानंतर आज दुपारी दोनच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट आणि पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांत पावसाचा जोर वाढला आणि मान्सूनच्या पावसापेक्षाही जोरदार सरी कोसळल्या आहेत. शहराच्या काही भागात गारपीट देखील झाली आहे.
सोबत विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहिल्याने अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. बाजारपेठेत फूटपाथवरील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. भाजी बाजारातील व्यावसायिकांचंही नुकसान झालं. पाऊस सुरू होताच शहरातील काही भागात वीज पुरवठा सुद्धा खंडीत झाला होता. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतातील कापूस, तूर, हरभरा, गहू, कांदा आणि अन्य भाजीपाला या पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात देखील ढगांचा गडगडासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून शेतकरी पून्हा संकटात सापडला आहे. शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर या तालुक्यात देखील अवकाळी पावसाच्या दमदार सरी कोसळत आहे.
येत्या काही तासांत पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून पुढील तीन तासांत नाशिक, अहमदनगर आणि नागपुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर औरंगाबाद, जालना आणि गडचिरोली याठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Reply