सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ वकिलांचे सरन्यायाधिशांना पत्र, धार्मिक मेळाव्यादरम्यान केलेल्या भाषणांवर व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : २७ डिसेंबर – सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण यांना पत्र लिहिले आहे. हरिद्वार आणि दिल्लीतील धार्मिक मेळाव्यांदरम्यान केलेल्या भाषणांवर या पत्रात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या नावाखाली देशाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या पत्रात म्हटले आहे. ‘घर वापसी’ची हाक आणि परिषदांमधून होत असलेल्या वक्तव्यांमुळे देशातील अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण होत आहे. सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती या वकिलांनी केली आहे.
हरिद्वार धर्म संसदेत द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एनव्ही रमण यांना पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ वकिलांनी सरन्यायाधिशांना धर्मसंसदेच्या नावाखाली झालेल्या द्वेषपूर्ण भाषणांची दखल घेण्याची विनंती केली आहे. १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत हरिद्वार येथे झालेल्या संतांच्या सभेत देशाच्या संवैधानिक मूल्यांच्या आणि जातीय सलोख्याच्या विरोधात सातत्याने भाषणे झाली. अल्पसंख्याकांच्या विरोधात शस्त्र उचलण्याचीही चर्चा होती असे वकिलांनी म्हटले आहे.
हरिद्वार आणि दिल्लीतील धार्मिक संमेलनांकडे लक्ष वेधून दुष्यंत दवे, प्रशांत भूषण आणि वृंदा ग्रोव्हर, सलमान खुर्शीद आणि पटणा उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश अंजना प्रकाश यांच्यासह नामवंत वकिलांनी स्वाक्षरी केलेले पत्र सरन्यायाधीशांना देण्यात आले आहे. ही घटना आणि भाषणे केवळ द्वेषपूर्ण भाषणे नाहीत तर संपूर्ण समुदायाच्या हत्येची खुली हाक आहे, असे या वकिलांनी म्हटले आहे.
ही भाषणे आपल्या देशाची एकता आणि अखंडतेलाच गंभीर धोका निर्माण करत नाहीत तर लाखो मुस्लिम नागरिकांचे जीवन धोक्यात आणत आहेत असेही यात म्हटले आहे. नरसंहार आणि मुस्लिमांविरुद्ध शस्त्रे वापरण्याच्या खुले आवाहनांबद्दल सोशल मीडियावर आक्रोश आणि निषेधानंतर, चार दिवसांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये फक्त एका व्यक्तीचे नाव होते. त्यानंतर धर्म दास आणि एक साध्वी अन्नपूर्णा यांचे नाव त्यात टाकण्यात आले.
व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये साध्वी अन्नपूर्णा यांनी “जर तुम्हाला त्यांना संपवायचे असेल तर त्यांना मारून टाका. आम्हाला १०० सैनिक हवे आहेत जे २० लाखांना मारतील, असे म्हणताना दिसत आहेत. ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला आणि द्वेषपूर्ण भाषणे दिली, त्यांचा दावा आहे की त्यांनी कोणतीही चूक केली नाही.

Leave a Reply