शेकोटीसाठी चोरट्याने पेटवली दीड लाखाची बाईक

नागपूर : २६ डिसेंबर – नागपूर शहरात मागील सोमवारपासून थंडीचा कडाका वाढला आहे. दरम्यान, थंडीची तीव्रता कमी होत असली तरी नागपूरचे तापमान हे शनिवारी १३ अंश रेकॉर्ड करण्यात आले आहे. दरम्यान, कडाक्याच्या थंडीत अवतीभवती कुठलेही सरपण नसल्याने एका चोरट्याने शेकोटीसाठी थेट दीड लाखांची बाईक पेटवून दिल्याची घटना पुढे आली आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर थंडीमुळे बाईक पेटविल्याचे चोरट्याने सांगितल्यानंतर पोलिसही थबकले.
ही घटना यशोधरा पोलिस ठाणे हद्दीत घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, पोलिसांना आरोपी अहमद खान रशिद खान, शेरा ऊर्फ समीर अहमद जाकिर अहमद, करण किशोर यादव हे तिघे गवसले. या गुन्हय़ात पोलिसांनी त्यांना अटकही केली. या आरोपीकडून पोलिसांनी चक्क ९ चोरीच्या दुचाकीही जप्त केल्या. चोरीची एक दुचाकी घेऊन मोहम्मद सरफराज सुलतान अंसारी तसेच सय्यद आसिफ सय्यद निजाम दोघे पळून गेले. या फरार असलेल्या आरोपींपैकी एकाला सरफराज याला पोलिसांनी अटकही केली. यावेळी पोलिसांनी ठाण्यात आरोपींना दुचाकीबाबत विचारणा केली. यावेळी आरोपींनी ही दुचाकी एका शेतात असल्याचे सांगितले. पोलिस आरापींना घेऊन शेतात पोहोचले खरे; परंतु शेतात या दुचाकीचा जळलेला केवळ सांगाडा उरला होता. यावेळी पोलिसांनी गाडी जळल्याबाबात विचारणा केली असता आरोपींनी सांगितलेल्या उत्तरावरून पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आणि हात कपाळाशी मारल्या गेला. आरोपींनी सांगितले की, फरार झाल्यानंतर पोलिसांच्या धाकाने दुचाकी घेऊन शेतात लपलो. दरम्यान, रात्री गारठा वाढल्यामुळे अवतीभवती शेकोटी पेटविण्याकरिता अर्थात उब घेण्याकरिता काहीही नसल्यामुळे दुचाकीच्या पेट्रोल टाकीला फोडून दुचाकीच पेटवून दिली. बाईक पेटल्यानंतर उब मिळाल्याचेही आरोपींनी सांगितले.

Leave a Reply