वाशीम दरोड्यातील आरोपींना अटक

वाशीम : २६ डिसेंबर – मालेगाव शहरातील सराफा व्यावसायिक व त्याच्या सहकाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. यानंतर हवेत गोळीबार करून व्यावसायिक व त्याच्या सहकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करत ९ लाख रुपयांचा ऐवज लूटून नेला. मालेगावात २१ डिसेंबरच्या रात्री ९ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत सराफा कारागिराचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जलदगतीने मागोवा घेत या घटनेतील मुख्य आरोपी अजाबराव बबनराव घुगे याला ताब्यात घेतले असून, त्याचे चार सहकारी अजूनही फरार आहेत.
अधिक माहितीनुसार, मालेगाव शहरातील योगेश अंजनकर हे त्यांची सोन्या चांदीची दुकानबंद करून सहकारी कारागिर रविंद्र वाळेकरसह घरी जात होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. यानंतर हवेत गोळीबार करत दोघांवर धारदार शस्त्राने सपासप वार केला. यानंतर त्यांच्या ताब्यातील ९ लाख रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने व रोख ९ हजार घेऊन पोबारा केला.
या हल्ल्यात रवींद्र वाळेकरचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला तर योगेश अंजनकर याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांनी पोलिस ताफ्यासह तातडीने घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध घेण्यासाठी चार टीम गठीत केल्या. दरम्यान, मालेगाव पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी अजाबराव घुगे याच्या मुसक्या आवळत दोन देशी कट्ट्यास २ लाख ४0 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस चौकशीदरम्यान, ताब्यातील आरोपीने सहकाऱ्याची माहिती दिली असून, पोलिस त्या आरोपींच्या शोधात आहेत. यासाठी पोलिस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये, पोलिस उपनिरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक महल्ले व स्थानिक गुन्हे शाखेचे फरार आरोपीच्या शोधासाठी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. पुढील कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिह, अपर पोलिस अधीक्षक गौरव भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पुजारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.मात्र, जिल्ह्यात दरदिवशी घडणाऱ्या गंभीर घटना पोलीस गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप आता जनसामान्यामधून होऊ लागला आहे.

Leave a Reply