गोंदियात आश्रम शाळा कर्मचाऱ्याची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या

गोंदिया : २६ डिसेंबर – गोंदिया तालुक्यातील दरेकसा आश्रम शाळा जमाकुडो येथील कर्मचाऱ्यांची कुऱ्हाडीने मारून हत्या करण्यात आल्याची घटना सायंकाळी ५ वाजेदरम्यान उघडकीस आली. दरवन कोठूजी वाढिवे (वय ५३) रा. शिवारीटोला असे मृतकाचे नाव आहे.
सविस्तर असे की, दरवन कोठूजी वाढिवे हे नित्यप्रमाणे सकाळी ६ वाजता दरेकसा येथील आश्रम शाळेत कामाकरिता गेले. दरम्यान, सायंकाळी शिवारीटोला येथे मृतकाच्या भावाला माहिती मिळाली की, कुलरभट्टी येथे दरवनची हत्या झाली आहे. याची माहिती दरवनच्या पत्नीला मिळताच दरवनची पत्नी गीता व नातेवाईक कैलाश उईके हे दोघे दुचाकीने कुलरभट्टी येथे गेले. दरम्यान, कुलरभट्टी येथील ब्रिजलाल दामा मडावी यांच्या घरासमोर अंगणात एका प्लास्टिकच्या खुर्चीवर रक्ताच्या थारोड्यात दरवनचा मृतदेह दिसून आला. विशेष म्हणजे गीताने त्याला बघितले असता मानेवर, गळ्यावर व डोक्यावर कुऱ्हाडीचे वार दिसून आले. त्यातच ब्रिजलाल मडावी यांची मुलगी लक्ष्मी हिचामी हिला गीताने विचारले असता तिने दोन अनोळखी इसमांनी मारल्याचे सांगितले. तसेच वाचविण्यासाठी गेले असता मलाही मारण्याची धमकी दिल्याची माहिती दिली. गीता वाढिवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.
सदर कर्मचाऱ्यांची हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याची माहिती मिळू शकली नसून याप्रकरणी पोलिसांनी तपास कार्य सुरू केले आहे.

Leave a Reply