आमदार संजय राठोड यांच्यावर कोरोना नियम डावलून कार्यक्रमाला गर्दी जमवल्याचा आरोप

यवतमाळ : २६ डिसेंबर – राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी त्यांच्या मतदारसंघातील दिग्रस येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल या इमारतींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी राठोड यांनी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची ‘हास्य जत्रा’ फेम कलावंत अरुण कदम व समीर चौगुले यांना बोलावलं. त्यामुळे या कार्यक्रमात कलाकारांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे आमदार राठोड यांच्यावर शासनाचे करोना नियम डावलून कार्यक्रमाला गर्दी जमवल्याचा आरोप होत आहे.
एकीकडे राज्यात वाढत्या कोविड संसर्गामुळे राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. असं असताना सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार विकास कामाचा मोठा वाजागाजा करत भूमिपूजन केले.
दरम्यान या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी कलावंतांना बोलावण्यात आल्याचाही आरोप होतोय. सिने कलाकारांना बघण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने नियम फक्त सर्व सामान्य नागरिकांनाच आहेत का? असाही प्रश्न विचारला जातोय.

Leave a Reply