वैभव खेडेकर नेमके कुणाचे जावई आहेत? – रामदास कदम यांचा पक्षाला घरचा आहेर

मुंबई : २४ डिसेंबर – शिवसेना नेते रामदास कदम आज काही कामानिमित्ताने विधानभवनात आले होते. यावेळी त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी विधानभवन परिसरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर तीन गंभीर आरोप केले आहेत. “विशेष म्हणजे खेडेकर यांच्या भ्रष्टाचारांचे सर्व पुरावे प्रशासनाकडे सादर केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई केली जात नाहीय. त्यामुळे वैभव खेडेकर नेमके कुणाचे जावई आहेत?”, असा प्रश्न रामदास कदमांनी उपस्थित केला.
वैभव खेडेकर मनसेचे नगराध्यक्ष आहेत. पण ते सध्या राष्ट्रवादीसोबतच दिसतात. राष्ट्रवादी आणि त्यांची मिलीजुली आहे. खेड तालुक्यात भडगाव म्हणून गाव आहे. तिथे त्यांनी एका नाल्याभोवती समाजकल्याण खात्यामधून निधी आणूण बोद्धवाडी आहे असे दाखवून पूल बांधला. तो पूल खासगी बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी बौद्धवाडीच्या नावाने बनवला. संबंधित बिल्डिंगमध्ये त्यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांच्या नावाने तीन फ्लॅट आहेत. या प्रकरणी मी अनेक तक्रारी केल्या. सामाजिक बांधकाम, सामाजिक न्याय विभाग, जिल्हाधिकारी, आयुक्त, सचिव यांना तक्रारी केल्या. शेवटी या सगळ्या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांकडून करुन घेतली”, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली.
“तिथल्या ग्रामपंचायतीने लिहून दिलं की, संबंधित पुलाचा उपयोग बौद्धवाडीसाठी होत नाही. इथे मुळात बौद्धवाडीच नाही. तिथल्या ग्रामपंचायतीने ठराव पास करुन लिहून दिलं की, त्या पुलाचा उपयोग बौद्धवाडीसाठी नाही तर फक्त बिल्डिंगसाठी होतोय. सभापतींनी, प्रांत अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल समाज कल्याण विभागाला पाठवला आहे. या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. पण एक महिना झाला तरी अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही”, असं रामदास कदम म्हणाले.
खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष असल्यामुळे त्यांना 50 टक्के पेक्षा अधिक खर्च असल्यामुळे नियमाने एकही लिटर डिझेल वापरता येत नाही. या महाशयांनी साडेतीन लाखांचे स्वत:च्या गाडीसाठी डिझेल वापरले आणि 23 लाखांचे डिझेल खासगी गाड्यांसाठी वापरले. काही गाड्यांना नंबरच नाही. काही गाड्या बंद पडल्या आहेत. त्यांच्या नावाने डिझेलचा खर्च दाखवला गेला. दोनचाकी गाड्यांसाठी देखील इंधनाचा खर्च दाखवला. असा एकूण 23 लाखांचा घोटाळा या माणसाने केला. एवढा घोटाळा केल्यानंतरही त्या माणसावर कारवाई केली जात नव्हती. अखेर मी नगरविकास खात्याकडे तक्रार केली. सर्व पुरावे दिले. तेव्हा आता नगरविकास विभागाने गुन्हा दाखल करण्यास सांगितलं आहे. दोन महिने झाले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाहीय”, असं कदम यांनी सांगितलं.
“वैभव खेडेकर यांचे अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणं बाहेर काढली. जिल्हाधिकाऱ्यांकडे 50 टक्क्यापेक्षा अधिक नगरसेवकांनी नगराध्यक्षपादासाठी अपात्र करण्यासाचा प्रस्ताव पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांची सुनावणी घेतली. नियमाप्रमाणे आपला अहवाल शासनाकडे पाठवला. त्यांना अकरा प्रकरणांमध्ये दोषी ठरवलं आहे. शासनाने ते प्रस्ताव अजून दाबून ठेवले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल देवून सुद्धा नगरविकास खात्याकडून ते प्रस्ताव दाबले जात आहेत. सरकार आमचं आहे, नगरविकास खातं आमचं आहे. गंमत म्हणजे वैभव खेडेकरांवर गुन्हे दाखल करणं किंवा त्यांना अपात्र ठरवणं बाजूला, उलट त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय. म्हणून मी आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना चौकशी करुन बघा, असं सांगितलंय. हा बंदोबस्त नेमका का दिला आहे? त्यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? ते नेमके कोणाचे जावई आहेत? ही माहिती घ्या. हे सगळे मुद्दे आज मी सभागृहात मांडले. मला विश्वास आहे, सभापती महोदयांनी सांगितलंय, याबाबत चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय. शंभूराजेंनी आश्वासन दिलं आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
“शंभूराजेंना मी जवळपास दहा पत्रे दिले. त्यांचे साधे उत्तरही नाही. मीही मंत्री होतो. एखाद्या आमदाराने पत्र लिहिले तर आम्ही त्याला उत्तर देतो. पण इतके वर्ष या सदनमध्ये काम केल्यानंतर माझ्या पत्राला केराची टोपली दाखवली जात असेल तर साहजिकच दु:ख होणार. त्यातून मी त्यांना हे चुकीचं असल्याचं बोललो. खरंतर नियमाप्रमाणे 15 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा लागतो. शेवटी उद्यापासून खेडचे नगरसेवक उपोषण करत आहेत”, असं रामदास कदम म्हणाले.

Leave a Reply