विधानसभेत अनिल परब व नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी

मुंबई : २३ डिसेंबर – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादावादी झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही काहीसा असाच प्रकार पहायला मिळाला. राज्याचे परिहवन मंत्री अनिल परब आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. एका प्रश्नावर परिवहन मंत्री अनिल परब हे उत्तर देत असताना नितेश राणे हे मध्येच बोलले आणि त्यानंतर दोघांत वाकयुद्ध सुरू झालं.
वाशी येथील परिवहन कार्यालयातील वाहनांचा कर वसूल करण्याबाबत भाजप आमदार मंगल प्रभात लोढा प्रश्न विचारला. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब उत्तर देत होते. अनिल परब हे उत्तर देत असतानाच नितेश राणे हे मध्ये बोलले. यानंतर अनिल परब त्यांना म्हणाले, त्यांनी प्रश्न विचारला मी त्यांना उत्तर देतो.
कर वसूल करण्यात आलेली रक्कम जमा करण्यात आली नसल्याचं मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं. यावर अनिल परब म्हणाले, कुठल्याही रक्कमेचा अपहार झालेला नाहीये, असं म्हणताच नितेश राणे यांनी मध्ये बोलण्यास सुरुवात केली. यानंतर अनिल परब संतापले आणि म्हटलं, त्यांनी प्रश्न विचारला मी त्यांना उत्तर देतो. आपली वेळ येईल तेव्हा आपण प्रश्न विचारा. एक तर ते त्यांच्या जागेवर नाहीयेत. आधी तुमच्या जागेवर जा. यांची आसन व्यवस्था मला दाखवा. त्यांना त्यांच्या जागेवर पाठवा. सभापतींनी परवानगी दिल्यावर प्रश्न विचारण्यासाठी उपस्थित करा.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, आपण आसन क्रमांक सांगाव त्या आसनावर सदस्य बसतील. 96 आसन क्रमांक आम्ही त्यांना दिला आहे. तुम्ही आम्हाला केवळ आसन अलॉट करुन देता आम्ही आमचे आसन ठरवतो.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. संतापलेल्या शिवसैनिकांकडून आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवसेनाबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चूकीची माहीती ट्विटरद्वारे पसरवल्याचं सांगत काल रात्री मुंबईतल्या वरळी, भोईवडा, काळाचौकी आणि भायखळा पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आपल्या तक्रारीत शिवसेनेने म्हटले, नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव लिहून शिवसेनेचे नाव बदलणार का? असे लिहिल्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब हे आमचे दैवत असून तीव्र भावना दुखावल्याबद्दल नितेश राणे यांच्यावर तातडीने कारवाई करुन एफआयआर दाखल करण्यात यावा. तसेच त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात यावे.

Leave a Reply