संपादकीय संवाद – देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी परकीय खुणा बदलवायलाच हव्या

तेलंगणाची राजधानी असलेल्या हैद्राबाद या शहराचे जुने नाव असलेले भाग्यनगर हे नाव पुन्हा प्रतिष्ठित करण्यात यावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्विटर हँडलवर हैद्राबादचा उल्लेख भाग्यनगर असा करण्यात आला आहे, यामुळे राजकीय आणि गैरराजकीय वर्तुळात चर्चांचे पेव फुटले आहे.
इसवी सनानंतर सातव्या-आठव्या शतकापर्यंत या भारतभूमीत फक्त हिंदूंचेच वास्तव्य होते, हा देश हिंदूंचा म्हणून हिंदुस्थान असा या देशाचा उल्लेख होत होता. तर भारतवंशीयांला पहिला राजा भरत याचे राज्य असलेली ही भूमी भारतदेश म्हणूनही ओळखली जात होती. इथे अनेक छोटी छोटी राज्ये होती. आठव्या शतकापासून इथे उत्तरेकडून आक्रमणे व्हायला लागली. त्यात बहुसंख्य मुस्लिमच होते. हे मुस्लिम पुढे राज्यकर्ते बनले. त्यांनी इथल्या अनेक प्रदेशांना, शहरांना आणि गावांना आपली नावे दिली, मग औरंगजेबाची राजधानी म्हणून औरंगाबाद बनले, तर अयोध्येत फैजाबाद आले. इंद्रप्रस्थ म्हणून ओळखली जाणारी राजधानी दिल्ली बनली.
मुस्लिमांनंतर व्यापाराच्या निमित्ताने या देशात इंग्रज आले. त्यांनी व्यापार करताकरता राज्यकारभारही हातात घेतला, मग त्यांनी मुंबईचे बॉंबे केले, कोलकात्याचे कलकत्ता केले, आणि शेवटी भारताचे नामकरण इंडिया असे केले. देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७४ वर्ष झाली, तरी अजूनही इंग्रज आणि मुस्लिमांची आठवण देणारी ही नावे कायम ठेवण्यात आली आहेत. नाही म्हणायला गेल्या काही वर्षात ही नावे बदलायला सुरुवात झालेली आहे. बॉंबेचे नाव आता मुंबई सर्वत्र रूढ झाले आहे. मद्रासची चेन्नई झाली आहे, मात्र अजूनही इंडियाचे भारत हे नाव जागतिक स्तरावर प्रतिष्ठित झालेले नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवातीपासून हिंदुत्व आणि भारतीयत्वाची कास धरलेली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यवहारात तरी भारतीय नावे प्रचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर त्यांनीही इंग्रजी पाऊलखुणा पुसण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याची सुरुवात त्यांनी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानासमोरच्या मार्गाचे नाव बदलूनच केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्या पंतप्रधानांचे निवासस्थान तीन मुर्ती लेनवर होते, नंतर इंदिराजींच्या काळात ते सफदरजंग रोडवर आले, राजीव गांधींच्या काळापासून ते निवासस्थान रेसकोर्स रोडवर आले होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर याच निवासस्थानी राहायला आले, त्यांनी थोड्याच दिवसात या रस्त्याचे नाव रेसकोर्स रॉड बदलून लोककल्याण मार्ग असे प्रतिष्ठीत केले. इतरत्रही असे नामांतर करण्याला त्यांचे उत्तेजन आहे. आताही उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात काही शहरांची नावे बदलण्यात आली आहेत.
खरे तर स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत देशातील पारतंत्र्याच्या असलेल्या सर्वच खुणा मिटवून टाकायला हव्या होत्या, मात्र आतापर्यंत इथल्या राज्यकर्त्यांनी या खुणा जपण्यातच धन्यता मानली. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाचे विभाजन झाले, त्यावेळी पाकिस्तानचे जनक बॅरिस्टर जिना यांनी आम्हाला इंग्रजांचे कोणतेही नाव नको असे सांगत देशाचे नाव पाकिस्तान असे ठेवले. मात्र भारतातर्फे बोलणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंडिया दॅट इज भारत हे नाव कायम ठेवले. आपल्या देशाची घटना लिहिली गेली, तिच्या प्रास्ताविकतही नेहरूंनी इंडिया दॅट इज भारत असा उल्लेख करून इंडिया हे नाव जागतिक स्तरावर प्रतिष्ठित करण्याचा आग्रह धरला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायमच या परकीय खुणांना विरोध केला आहे. २०१४ साली देशात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आले, त्यावेळी देशाची घटना बदलली जाणार अशी ओरड करण्यात आली. ऑक्टोबर २०१७ मध्ये संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्लीत विचारवंत पत्रकार आणि साहित्यिकांची एक बैठक घेतली होती, यावेळी संघ घटना बदलाचा आग्रह धरणार काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरात डॉ. भागवतांनी आम्ही घटना बदलणार नाही असे स्पष्ट केले. मात्र घटनेत एक बदल नक्की करू तो म्हणजे प्रास्ताविकेत असलेला इंडिया दॅट इज भारत यातील इंडिया हा शब्द काढून जागतिक स्तरावर आणि देशातही भारत हे नाव प्रतिष्ठित करण्याचा आग्रह धरू असे त्यांनी ठणकावले होते. त्यानंतर नागपुरातही काही पत्रकारांनी डॉ. भागवतांना विचारले असता, त्यांनी या परकीय खुणा आम्हाला मिटवायच्याच आहेत आणि योग्य वेळी आम्ही त्याचा आग्रह धरू असे त्यांनी स्पष्ट केले होते.
संघाची ती योग्य वेळी आली आहे, असे जाणवते. आज संघाने हैदराबादचे नामांतरण करण्याचा आग्रह धरला, तसाच त्यांनी इंडिया हे नाव हटवून भारत हे नाव सर्वत्र प्रतिष्ठित करण्याचा आग्रह धरावा त्यामुळे प्रत्येक नागरिकात आम्ही इंडियन आहोत ही भावना संपून आम्ही भारतीय आहोत ही भावना जागृत होईल आणि प्रत्येक नागरिकात हे राष्ट्रीयत्व जागृत झाले तर देशाला महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही.

अविनाश पाठक

Leave a Reply