रिक्षाची चाकं, हिरो होंडाचं इंजिन अन्य गाड्यांचे सुट्टे भाग वापरून सांगलीतील अवलियाने बनवली ‘जुगाड जिप्सी’

सांगली : २२ डिसेंबर – आपल्या देशात टाकाऊ वस्तूंपासून भन्नाट गोष्टी तयार करणाऱ्या लोकांची कमी नाहीये. यापूर्वी देखील अनेकांनी अशाप्रकारचे यशस्वी प्रयोग करून दाखवले आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये सांगलीतील एका अवलियाने देशी जुगाड लावून थेट मिनी जिप्सी साकारली आहे. रिक्षाची चाकं, हिरो होंडाचं इंजिन आणि इतर अन्य गाड्यांचे सुट्टे भाग वापरून संबंधित व्यक्तीने चारचाकी गाडी तयार केली आहे. त्यांनी या गाडीला ‘जुगाड जिप्सी’ असं नाव ठेवलं आहे.
कोणतंही उच्चशिक्षण न घेता त्यांनी बनवलेली ही भन्नाट कार अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. शिक्षण कमी असलं तर टॅलेंटमध्ये काडीभरही कमी नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. दत्तात्रय लोहार असं ही कार निर्माण करणाऱ्या अवलियाचं नाव आहे. दत्तात्रय लोहार हे सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथील रहिवासी असून त्यांचा फॅब्रिकेशनचा छोटासा व्यवसाय आहे.
एकेदिवशी दत्तात्रय यांच्या मुलाने आपल्याकडेही चारचाकी गाडी असावी, असा हट्ट धरला. पण घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने नवी कोरी किंवा सेकंड हॅंड चारचाकी खरेदी करणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे त्यांनी स्वत:च कार निर्मिती करण्याचा मानस बनवला. मुलाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी विविध गाड्यांच्या सुट्टे भाग एकत्र करत ही भन्नाट जिप्सी बनवली आहे. यामध्ये त्यांनी दुचाकी पॅशन गाडीचं इंजिन, रिक्षाची चाकं, पुढचा भाग हा जीपचा वापरला आहे. तर स्टेअरिंग रॉड त्यांनी स्वत: तयार केला आहे.
ही मिनी जिप्सी पट्रोल इंधनावर पळते तर याचं स्टेअरिंग उजव्या ऐवजी डाव्या बाजूला बसवण्यात आलं आहे. ही गाडी 40 ते 50 किमीचं मायलेज देत असून यामध्ये चार जण बसू शकतात. याचा आकार नॅनो कारपेक्षाही लहान आहे. ही जिप्सी बनवण्यासाठी दत्तात्रय यांना एकूण 50 ते 60 हजारांचा खर्च आला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून अनेक नेटकरी त्यांच्या टॅलेंटचं भरभरून कौतुक करत आहेत.

Leave a Reply