मगरीला पकडण्यासाठी वन विभागाचे मिशन मगर सुरु

नागपूर : २२ डिसेंबर – नागपूर शहराच्या मध्यभागी नाग नदीत मगरीचं वास्तव्य आहे. शहराच्या मध्यभागी मगर आढळल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळं मगरीला पकडण्यासाठी वन विभागाने मिशन मगर सुरु केलंय. महाराजबाग परिसरात वन विभागाचे कर्मचारी २४ तास तैनात असतात. याच परिसरात मगरीला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेत. शिवाय कॅमेरा ट्रॅपही बसवण्यात आलाय, अशी माहिती वन विभागाचे महेशकुमार बोरकर यांनी दिली.
महाराजबागेच्या नदीपात्रात सोमवार आणि मंगळवारी वनविभागाच्या पथकाला ही मगर दिसली. ही मगर आकारानं मोठी असल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी दुपारनंतर तिला पकडण्यासाठी नदीच्या पात्रात लोखंडी पिंजरा लावण्यात आला. मगरीला पाहण्यासाठी नदीपरिसरात पुन्हा गर्दी होत आहे. सोमवारी लोकं नदीत मगर दिसते का म्हणून पाहत होते. मंगळवारीही हीच परिस्थिती होती. पण, अद्याप तिला पकडण्यात वनविभागाला यश आलेलं नाही.
शहरात काही दिवसांआधी बिबट्याची दहशत होती. आता त्यात नवीन पाहुण्याची भर पडली आहे. शहरातील नागनदीत मगर आढळली. मागील महिन्याभरापासून नाग नदीत मगर दिसल्याबाबत बरेच दावे व अफवा पसरल्या होत्या. अखेर शहरात खरोखरच मगर असल्याचं स्पष्ट झालंय. वनविभागाच्या कर्मचार्यांना पहिल्यांदाच मगर प्रत्यक्षरित्या दिसली. त्यानंतर युद्धस्तरावर मगरीला पकडण्यासाठी व्यूहरचना ठरविण्यात आली. विशिष्ट क्षेत्रात मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले आहेत. दिवसभर वनविभागाची चमू नदीच्या काठी निरीक्षण करीत होती. दुसरीकडे नदीच्या प्रवाहात कुणीही उतरू नये, या आशयाचे फलक संबंधित भागात वनविभागातर्फे लावण्यात आले आहेत.
१३ नोव्हेंबर रोजी पत्रकार सहनिवासाच्या मागे नाल्याच्या स्वरूपात वाहणार्या नाग नदीत पहिल्यांदा मगर स्थानिक नागरिकांना दिसली होती. यानंतर मगरीची छायाचित्रे व व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. वनविभागाच्या चमूला एकदाही मगर दिसली नव्हती. पंधरा दिवस अगोदर मोक्षधामजवळदेखील एका व्यक्तीने नदीच्या प्रवाहात मगर दिसल्याचा दावा केला होता. परंतु शोधपथकाला काहीच आढळले नव्हते. आता संबंधित चमूला प्रत्यक्ष मगर दिसल्याने दावे खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. नदी किंवा नाला हे मगरीचे मूळ अधिवास नाही. काही काळाअगोदर मगरीच्या पिल्लाला कुठूनतरी आणल्यानंतर एखाद्या व्यक्तीने उगाच अडचण नको म्हणून नाग नदीच्या प्रवाहात त्याला सोडले असेल. तीच मगर आता मोठी होऊन प्रवाहात दिसत आहे, अशी शक्यता आहे. महाराजबागच्या पाठीमागील भागात मगर दिसल्यानंतर पिंजरे लावण्यात आले आहेत. नदीतील पाणी मगराली राहण्यायोग्य नाही. त्यामुळं मगरीला पकडून मूळ अधिवासात सोडण्यात येणार आहे, असे नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी सांगितले.

Leave a Reply