बापाने मुलीवर बलात्कार करणे मानवतेविरुद्धचा आणि दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा – उच्च न्यायालयाचे निरीक्षण

नागपूर : २२ डिसेंबर – स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. असे म्हटले जाते. परंतु मुलांसाठी आई व वडील दोन्ही महत्त्वाचे असतात. बाप हा लेकरांसाठी आभाळ असते, डोक्यावरचं छप्पर असते. तो पोशिंदाही असतो व रक्षकही असतो. मात्र, हा रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा त्याला मृत्युदंडाची शिक्षाही कमी पडते. अशाच एका नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. हा मानवतेविरुद्धचा आणि दुर्मीळातला दुर्मीळ गुन्हा आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणावरील निर्णयात नोंदविले. या निर्णयाद्वारे नराधम बापाची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली.
हे प्रकरण बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील असून, आरोपी व्यवसायाने मजूर आहे. तो स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार करीत होता. दरम्यान, मुलीचा दोनदा गर्भपात करण्यात आला. तिसऱ्यावेळी मुलीने बाळाला जन्म दिल्यामुळे आरोपीचे कुकृत्य पुढे आले. डीएनए चाचणीवरून नवजात बाळाचा बापच आरोपी असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर विशेष सत्र न्यायालयाद्वारे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे आरोपीने त्याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता वरील निरीक्षण नोंदवून ते अपील फेटाळून लावले. या प्रकरणात बापानेच मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. हा अत्यंत अश्लील, जघन्य व खुनापेक्षाही अधिक गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आरोपीविषयी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, असेदेखील न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठचे न्यायमूर्तीद्वय महेश सोनक व पुष्पा गणेडीवाला यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली

Leave a Reply