पंतप्रधान मोदींच्या विचारांची जी उंची आहे ती महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांमध्ये येणं शक्य नाही – विनायक राऊत

नवी दिल्ली : २२ डिसेंबर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपुलकीने त्यांची चौकशी केली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ही माहिती दिली. दरम्यान यावेळी त्यांनी प्रकृतीवरुन उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना मात्र सुनावलं आहे. पंतप्रधान मोदींच्या विचारांची जी उंची आहे ती महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांमध्ये कधी येणं शक्यच नाही अशा शब्दांत त्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळ बैठका, कामकाज, कार्यक्रमात सहभागी होत नसल्याने राज्यातील भाजपा नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
विनायक राऊत म्हणाले की, “संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो. नमस्कार केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची तब्येत कशी आहे? आज ते विधानसभेत जाणार आहेत का? अशी आपुलकीने चौकशी केली. आम्ही त्यांना माहिती दिली आणि पुढे गेलो”.
दरम्यान राज्यातील भाजपा नेते मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवरुन राजकीय विधानं करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांची जी उंची आहे ती महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांमध्ये कधी येणं शक्यच नाही. आजही उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील नातं त्यांना कळणार नाही. राज्य आणि देशाच्या विकासासाठी दोघांमध्ये चांगलं नातं आहे”.

Leave a Reply