पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशातील करोना संबंधित परिस्थितीचा घेणार आढावा

नवी दिल्ली : २२ डिसेंबर – देशात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची रुग्णसंख्या वाढत आहे. या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ डिसेंबर रोजी म्हणजेच उद्या आढावा बैठक घेणार आहेत. भारतातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या बुधवारी २१३ वर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात अनुक्रमे ५७ आणि ५४ अशी सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशातील करोना संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत,” एएनआय या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांचा हवाला देत ट्विट करून ही माहिती दिली.
एकूण २१३ रुग्णांपैकी ९० रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. तेलंगणात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २४, कर्नाटक १९, राजस्थान १८, केरळ १५ आणि गुजरातमध्ये १४ आहे. तर, जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील तीन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आंध्र प्रदेश, चंदीगड, लडाख, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये ओमायक्रॉनचे एकेक रुग्ण आहेत.
वॉर रुम्स पुन्हा सुरु करा, केंद्राचा राज्यांना आदेश..
करोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा घेतलेल्या केंद्र सरकारने राज्यांना महत्वाच्या सूचना केल्या असून गरज लागली तर नाईट कर्फ्यू लावा असा आदेशच दिला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमयक्रॉन तीन पट संसर्गजन्य असून त्याला रोखण्यासाठी वॉर रुमची गरज असल्याचंही केंद्राने राज्यांना सांगितलं आहे. केंद्राने राज्यांना काही सूचना केल्या असून यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचणी, नाईट कर्फ्यू आणि गर्दीवर नियंत्रण अशा मुद्द्यांचा उल्लेख आहे.
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवलं असून स्थानिक परिस्थितीनुसार काळजी घ्यावी असं सांगितलं आहे. तसंच गरज लागल्यास मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी असंही म्हटलं आहे. गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन तसंच आयसीयू बेडसाठी ४० टक्के व्याप्ती असेल तर ही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाऊ शकतात असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

Leave a Reply