जालण्यात मतदानादरम्यान महाविकास आघाडी व भाजप समर्थकांमध्ये तुफान हाणामारी

जालना : २१ डिसेंबर – राज्यात आज पार पडत असणाऱ्या १०५ नगरपंचायत आणि भंडारा गोदिंया जिल्हापरिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र या मतदानाला हिंसेचं गालबोट लागलंय. जालन्यामधील बदनापूर नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान महाविकास आघाडीचे समर्थक आणि भाजपा समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झालीय.
जालन्यातील बदनापूर नगरपंचायत निवडणुकीचं मतदान सुरु असतानाच दुपारच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली. भाजपा नगर पंचायत निवडणुकीत बोगस मतदान करत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केला. वार्ड क्रमांक १२ च्या मतदान केंद्राबाहेर सांबरे यांनी हा खळबळजनक आरोप केल्यानंतर बाचाबाचीपासून सुरु झालेला गोंधळ हाणामारीपर्यंत गेला.
बदनापूर नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी आज मतदान होत आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत पाहायला मिळत आहे. भाजपाचे स्थानिक नेते हे नगर पंचायत निवडणुकीत बोगस मतदान करत असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूकडून आधी बाचाबाची झाली आणि नंतर त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. दरम्यान, प्रकरण चिघळण्याआधीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मतदान केंद्राबाहेरील तणाव कमी झाला.
भाजपाकडून होणारा बोगस मतदानाचा प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याने भाजपाचे लोक बिथरल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे स्थानिक नेते संतोष सांबरे यांनी केलाय. तर महाविकास आघाडीचे नेते या निवडणुकीत बोगस मतदान करण्यासाठी लोक आणत असून हा प्रयत्न आम्ही हाणून पाडत असताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्याना शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप भाजपा आमदार नारायण कुचे यांनी केलाय. महाविकास आघाडीचा बोगस मतदानाचा प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याच दावा कुचे यांनीही केलाय. सध्या या परिसरामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

Leave a Reply