११ वर्षीय मुलाच्या संशयास्पद मृत्यूने जुना बगडगंज परिसरात तणाव

नागपूर : २० डिसेंबर – एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलास गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी बेदम मारहाण केल्याने त्याच्या मृत्यू झाल्याच्या आरोपाने नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना बगडगंज परिसरात तणाव निर्माण झाला होता.
बॉबी ऊर्फ वंशिल हर्षवर्धन डोईफोडे (वय ११) रा. जुना बगडगंज असे मृत बालकाचे नाव आहे. वंशिल हा तेजस्विनी शाळेत ६ व्या वर्गाचा विद्यार्थी होता. रात्री ८ च्या सुमारास त्याची प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बगडगंज भागात तणाव निर्माण झाला. उलटसुलट चर्चेला उधाण आले. वंशिलला तीन-चार दिवसांपूर्वी वस्तीतील दोन गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी बेदम मारहाण केली होती. घरी कुणाला काही सांगायचे नाही, अशी धमकीही दिली होती. त्यामुळे वंशिलने घरच्यांना काही सांगतिले नाही. मात्र, ताप आणि सर्वांग दुखत असल्याने घरच्यांनी त्याला डॉक्टरकडे नेले. उपचारानंतर त्याला घरी आणण्यात आले. शनिवारी रात्री त्याची प्रकृती पुन्हा खालावली आणि रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी वंशिलच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली. वंशिलच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ जखम दिसल्याने मारहाणीचा संशय अधिक गडद झाला आहे. त्या दोघांच्या मारहाणीमुळेच वंशिलचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. सदर प्रकरणी तूर्तास नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply