महाराष्ट्रात देवेंद्रजी गेल्या ७ वर्षांपासून तपास यंत्रणांचा वापर करत होते – नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : २० डिसेंबर – मुंबईतील क्रूज ड्रग्ज प्रकरणापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा, एनसीपी, समीर वानखेडे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. यादरम्यान, नवाब मलिक यांनी विरोधकांवर, एनसीपीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर देखील अनेक आरोप केले आहे. दरम्यान, आज सकाळी नवाब मलिक यांनी आपल्या घरी छापेमारी होणार असल्याचे सूतोवाच ट्वीट करून दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आज सकाळी नवाब मलिक यांनी केलेल्या ट्वीटची जोरदार चर्चा सुरू होती. “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माझ्याविरोधात तपास यंत्रणांना आदेश देण्यात बरेच इच्छुक दिसत आहेत. त्यांनी स्वत:ला या तपास यंत्रणांचे ओएसडी म्हणून नियुक्त करून घ्यावं. कारण त्यांना मुख्यमंत्री नियुक्त करण्याचा बराच अनुभव आहे. आणि किरीट सोमय्यांना या यंत्रणांचे प्रवक्ते म्हणून नियुक्त करावं”, असा खोचक टोला नवाब मलिक यांनी ट्वीटमधून लगावला होता.
यानंतर आता प्रसार माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. “गेली ७ वर्ष या देशात केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग होत राहिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा पराभव निश्चित झाल्यानंतर सपाच्या नेत्यांवर कारवाई व्हायला लागली आहे. महाराष्ट्रात देवेंद्रजी गेल्या ७ वर्षांपासून तपास यंत्रणांचा वापर करत होते. निवडणुकांच्या आधी पवार साहेबांना नोटीस काढण्यासाठी त्यांनी कटकारस्थान केलं होतं. आता आम्ही त्यांना उघडं करत असताना माझ्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, या पद्धतीने ते पाठपुरावा करत आहेत”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे. “राजकीय द्वेष ठेवून लोकांवर कारवाई केली जात आहे हे आता उघड होतंय. माझं म्हणणं आहे तुम्ही मागून करू नका, जबाबदारी स्वीकारा आणि कारवाई करा. आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्ही थांबणार नाहीत”, असं ते म्हणाले.
“काही यंत्रणेतले अधिकारी मला माहिती देत राहातात. दिल्लीहून काही लोक आले होते रात्री. पण माझ्या घरी आले नाहीत. मी घरातल्या लोकांना सांगून आलो आहे की त्यांना काही चहा-बिस्किट द्या. त्यांना कारवाई करू द्या, आपण त्यांना मदत करू. पण त्यांना कळलं पाहिजे, हे सर्व अधिकारी राजकीय द्वेष ऐकत नाहीत. काही लोक या भूमिकेला विरोध करतात ही माहिती माझ्याकडे आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.

Leave a Reply