एखाद्या खासदार किंवा आमदाराने अशाप्रकारे बोलणं योग्य नाही – हेमा मालिनी

नवी दिल्ली : २० डिसेंबर – नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभा घेतली होती. या सभेत आपल्या मतदारसंघातील रस्ते आपण हेमा मालिनींच्या गालासारखे केले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पाटलांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या टीकेचा भडीमार होत आहे. अशातच भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“माझे गाल आणि रस्त्यांची तुलना करण्याचा ट्रेंड काही वर्षांपूर्वी लालूजींनी सुरू केला होता. तो आजही सुरू आहे. त्यानंतर सर्वजण असं बोलू लागले. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने असं वक्तव्य केलं तर हरकत नाही. पण एखाद्या खासदार किंवा आमदाराने अशाप्रकारे बोलणं योग्य नाही,” असं हेमा मालिनी म्हणाल्या.
माझं आव्हान आहे ३० वर्ष राहिलेल्या आमदाराला, माझ्या धरणगावला या आणि तिथले रस्ते पाहा. सगळे रोड-रस्ते अभिनेत्री हेमा मालिनींच्या गालासारखे केले आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन. महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता तरी चांगला करा. हा योगायोग आहे की या जळगाव जिल्ह्याचं भाग्य खूप चांगलं राहिलंय. इथला कोणताही आमदार मंत्री झाल्यावर पाण्याचीच खाती मिळाली. एकनाथ खडसे जलसंपदा मंत्री, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री आणि गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री झाले,” असं गुलाबराव पाटील सभेत बोलताना म्हणाले.

Leave a Reply