वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सरड्यांचा स्वर्ग ! 

चाल चालती बगळ्यांची पण म्हणवुनि घेती हंस
कृष्णाच्या वेशात मिरविती गल्लोगल्ली कंस ।।

खोळ ओढुनी वनराजाची ऐटित चलती कोल्हे
हुजरेगिरी करणारे हुजरे तख्तारुढ झाले ।।

घालुन फिरती गळ्यात दिवसा रुद्राक्षी माळा
तेच शोधिती रातसमयिला वारांगनी चाळा ।।

म्हणवुनी घेती स्वतःस व्याख्याते प्रवचनकार
तेच हडपती लोकधनाला होउनि बेदरकार ।।

घोट पाजती इतर जनांना सत्चारित्र्याचे
वर्तन त्यांचे बघा सुजनहो कसे दाम्भीकांचे ।।

साहित्यातिल औरंग्यांना पुरस्कार सन्मान
शारदभक्तांच्या वाट्याला निष्कासन अवमान ।।

साहित्याच्या संपदेवरी नागनाथ बसती
नागदेव हा म्हणुनी जन हे त्यासच गौरविती ।।

चेहरा एकही नाही सच्च्या मुखवटेच सर्व
दुनिया आता बनली केवळ सरड्यांचा स्वर्ग ।।

         कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply