स्टेशनरी घोटाळा प्रकरणी सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, काही कर्मचाऱ्यांचे निलंबन

नागपूर : १७ डिसेंबर – महापालिकेच्या विविध विभागांसह झोन कार्यालयांना पुरवठा करण्यात आलेल्या स्टेशनरी व प्रिटिंग साहित्यात ६७ लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त यांच्यासह सहा जणांना प्रशासनाने नोटीस बजावली असून काहींचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या विविध विभागांना मनोहर साकोरे व त्यांच्या नातेवाईकांच्या फर्मच्या माध्यमातून स्टेशनरीचा पुरवठा केला जातो. यात मनोहर साकोरे अँण्ड कंपनी, स्वस्तिक ट्रेडिंग, गुरूकृपा स्टेशनरी, एस.के.एन्टरप्रायजेस व सुदर्शन आदी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी आरोग्य विभागाला कोविड कालावधीत साहित्याचा पुरवठा न करता बील उचलण्यात आल्याचा प्रकार आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या निदर्शनास आला. त्यांनी या संदर्भात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याकडे तक्रार केली. जोशी यांनी अधिक चौकशी केली असता २0 डिसेंबर २0२0 ते २१ मार्च २0२१ या कालावधीत विविध विभागांना स्टेशनरी साहित्याचा पुरवठा न करता ६७ लाखांची बिले उचलण्यात आल्याचे निदर्शनास आले. आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनंतर पुरवठादार पदमाकर (कोलबा) साकोरे, सुषमा साकोरे, मनोहर साकोरे व अतुल साकोरे यांनी स्टेशनरी साहित्यात ६७ लाखाचा भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांच्या गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. पुरवठादाराला अटक झाल्यानंतर सामान्य प्रशासन व लेखा विभागातील अधिकार्यांची चौकशी केली जाणार असून त्यात विभागातील अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील मुख्य पुरवठादार मनोहर साकोरे या पुरवठादाराला कोणत्या अधिकार्यांने कंत्राट दिले आहे. गेल्या दोन वर्षापासून महापालिकेला चार फर्मची वेगवेगळी नावे देत पुरवठा करत भ्रष्टाचार करत असल्यामुळे कोणत्या कोणाच्या आशीर्वादाने होत आहे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Leave a Reply