मी शिवरायांबद्दल बोललो त्यामध्ये काहीच चुकीचे नाही – चंद्रकांत पाटील

पुणे : १७ डिसेंबर – छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुंची व्होटबँक तयार केली आणि नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला, या वक्तव्यामुळे वादात सापडलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी आपल्या या विधानाचे समर्थन करताना आणखी एक वादग्रस्त टिप्पणी केली आहे. मी शिवरायांबद्दल बोललो त्यामध्ये काहीच चुकीचे नाही. त्यांनी व्होटबँक तयार केली म्हणजे ईव्हीएम मशीन घेऊन केली असा होत नाही. तर त्यांनी हिंदू जनमत संघटित केले. मावळ्यांना देश, देव आणि धर्मासाठी जगायला शिकवले. हिंदूंना संरक्षण दिले. शिवाजी महाराजांनी त्यावेळी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्मसमभावाची नव्हे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भूमिकेचे ठामपणे समर्थन केले आहे. गेल्यावेळी मी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मला धमक्या आल्या. काहीजणांनी आम्ही तुमच्याविरोधात निदर्शनं करु, असा इशारा दिला. मी एवढेच सांगतो की, आम्ही कोणाला डिवचणार नाही, पण कोणी आम्हाला डिवचलं तर सोडणारही नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या हिंदुत्वावादी भूमिकेचे समर्थन केले. पंतप्रधान मोदींनी हिंदूधर्मीयांची खरी गरज ओळखली. अयोध्या मुक्त केली पाहिजे, बाबरी पाडली गेली पाहिजे. कारण बाबर हा आमचा वंशज नव्हता, तो आक्रमक होता. राम आमचा वंशज होता. त्यामुळे मोदींनी अयोध्येत त्याचं मंदिर बांधायचा संकल्प केला. कारण मोदींनी माहितीये की, या देशातील सामान्य माणसाची गरज ही फक्त पोटाला अन्न इतकीच मर्यादित नाही. त्याला या स्थितीतही हरिद्वार, केदारनाथ आणि काशीविश्वेवराचं दर्शन घ्यायचे आहे. या देशात कित्येक वर्षे स्वत:च्या धर्माला वाईट म्हणा आणि दुसऱ्याच्या धर्माला बरं म्हणा, अशाप्रकारची धर्मनिरपेक्षता होती, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.
काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यांनी उमेदवारांच्या निवडणूक तिकीटाबाबत भाष्य करताना हे वक्तव्य केले होते. तिकीट हे पक्षाचे असते. व्होटबँक पक्षाची असते. व्होटबँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. हिंदुत्वाची व्होटबँक ही संत, महंत आणि शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची भूमिका घेऊन व्होटबँक डेव्हलप केली. त्याच्यावर अलीकडच्या काळात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या नेत्यांनी कळस चढवला, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply