अमरावतीत बिबट्या जेरबंद केलेल्या ठिकाणी आढळला दुसरा बिबट्या, परिसरात पुन्हा दहशत

अमरावती : १७ डिसेंबर – नांदगाव पेठ बुधवारी संगमेश्वर परिसरात बिबट्याने मजुरांसह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने बिबट जेरबंद केला. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, परंतु गुरुवारी नेहमीप्रमाणे जयस्वाल हे शेतात गेले असता त्यांना दुसरा बिबट सुद्धा त्याच परिसरात आढळल्याने शेतकरी व मजूर लोकांची चिंता वाढली आहे. याबाबत पोलीस तथा वनविभागाला माहिती देण्यात आली मात्र रात्रीची वेळ असल्याने वनविभागाने तूर्तास कार्यवाही करण्याचे टाळले. बुधवारी उपवनसंरक्षक कैलास भूंबर यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही करून शिताफीने बिबट जेरबंद करण्यात आला.त्यामुळे निश्चिंत होऊन आज परिसरातील शेतकरी व मजूर वगार्ने शेतीची कामे पार पाडली.शेती लागवड करणारे जयस्वाल यांनी आज दिवसभर शेतीची कामे केली आणि संध्याकाळी त्याच परिसरात दुसरा बिबट आढळल्याने त्यांनी तातडीने शेतातून पलायन करत संबंधित विभागाला माहिती दिली. रात्रीची वेळ असल्याने बिबटच्या शोधमोहिमेत अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे उद्या सकाळी वनविभाग शोधमोहीम राबवणार असल्याचे समजते.परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा या परिसरात जाणे टाळावे असे आवाहन सध्या पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply