शिक्षकाकडून ५० हजाराची लाच स्वीकारतांना शाळेची मुख्याध्यापिका व संस्थेचा सचिव अटकेत

नागपूर : १६ डिसेंबर – शाळेची मुख्याध्यापिका व सचिवाने शाळेतील एका शिक्षकाला हजेरी पटावर स्वाक्षरी करू न देता अतिरिक्त होण्याची भीती दाखवित ६ लाख ५0 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी करंभाड (ता. पारशिवनी) येथील तथागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शांतशीला मेश्राम (४६) आणि त्यांचे पती संस्थेचे सचिव भामराज दौलराव मेश्राम (५७) यांना तक्रारकर्त्याकडून ५0 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
पारशिवनी तालुक्यात करंभाड येथे तथागत विद्यालय आहे. ही शाळा संचालित करणाऱ्या संस्थेचे सचिव भामराज दौलतराव मेश्राम हे कोराडी येथील एका शाळेत शिक्षकही आहेत. त्यांची पत्नी शांतशीला भामराज मेश्राम या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. तक्रारदार शिक्षक हा शिक्षक पदावर तथागत विद्यालय येथे कार्यरत आहेत. तक्रारदार यांना आरोपी हे शाळेतील हजेरी पटावर स्वाक्षरी करू देत नव्हते. जानेवारी महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. जानेवारी महिन्यापासूनच ही शाळा ४0 टक्के शासकीय अनुदानावर आली. मात्र, गैरहजेरी लावल्याने तक्रारदार अतिरिक्त व अनियमित ठरणार होता. तो अतिरिक्त व अनियमित ठरू नये यासाठी आरोपींनी तक्रारदाराला ६ लाख ५0 हजार रुपयांची मागणी केली होती. २0 हजार रुपयाच्या मासिक वेतनात ५0 हजारांचा हप्ता मुख्याध्यापिका व संस्था सचिवास देणे शिक्षकाला शक्य नव्हते. संबंधित शिक्षकाने याबाबत सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. खापरखेडा येथे एसीबीने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली. मध्यरात्री खापरखेडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बुधवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करीत एक दिवसाचा पीसीआर एसीबीने मिळविला आहे

Leave a Reply