महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींवरून बंदी उठविल्याबद्दल सुनील केदार यांनी मानले न्यायालयाचे आभार

नागपूर : १६ डिसेंबर – गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात बैलगाड्यांच्या शर्यतीवर असलेली बंदी अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार हे स्पष्ट झाले आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार हे सातत्याने प्रयत्नशील होते. या संदर्भात निर्णय आल्याने त्यांनी न्यायालयाचे आभार मानले आहे.
केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० चा आधार घेऊन जुलै, २०११ मध्ये एक अध्यादेश काढण्यात आला होता. त्यानुसार प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. या अध्यादेशात बैलांचा समावेश वन्य प्राण्यांमध्ये करण्यात आला. यानंतर राज्य सरकारनेही ऑगस्ट, २०११ मध्ये एक परिपत्रक काढून बैलगाडीच्या शर्यतीवर बंदी घातली होती. या विरोधात महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने बैलड्यांच्या शर्यतीवरील बंदी उठवली आहे. न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केले आहे. अनेक वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होते. महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नाने हे शक्य झाले, असा दावा यांनी केला असून या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होण्याला बळ मिळणार असल्याचा विश्वासही मंत्री केदार यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवली आहे.

Leave a Reply